नवी दिल्ली : ‘मी जेव्हा विमानाने कर्नाटकला चाललो होतो त्यावेळी माझं विमान अचानक 8000 फूट खाली आलं. तेव्हा वाटलं की, आमची गाडी जणू काही थांबलीच... ज्यावेळी मी सुखरुप असल्याची मला जाणीव झाली त्यावेळी मला असं वाटलं की, मी कैलास मानसरोवरची यात्रा करावी.’ असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर कार्यकर्त्यांच्या काळजालाच हात घातला.
राहुल गांधी यांनी आपली मंदिर डिप्लोमसी सुरुच ठेवली आहे. कारण की, यंदा होणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेला जाणार असल्याचं राहुल गांधींनी जाहीर केलं आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर जनआक्रोश रॅलीमध्ये राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कर्नाटक निवडणुकीनंतर मानसरोवर यात्रेसाठी 15 दिवसांची सुट्टी मागितली आहे.
‘विमानातील बिघाडानंतर कैलास मानसरोवर यात्रा करायचं मनात आलं’
राहुल गांधी यांच्या मते, कैलास मानसरोवरच्या यात्रेचा विचार कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आला. रामलीला मैदानावरील जनआक्रोश रॅलीवेळी भाषण संपवल्यानंतर राहुल गांधी पुन्हा माईकजवळ आले आणि त्यांनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. ‘मला कळत नाही की, मी ही गोष्ट तुम्हाला सांगू की नको. ‘मी जेव्हा विमानाने कर्नाटकला चाललो होतो त्यावेळी माझं विमान अचानक 8000 फूट खाली आलं. तेव्हा वाटलं की, आमची गाडी जणू काही थांबलीच... ज्यावेळी मी सुखरुप असल्याची मला जाणीव झाली त्यावेळी मला असं वाटलं की, मी कैलास मानसरोवरची यात्रा करावी.’ असं म्हणत राहुल गांधींनी कार्यकर्त्यांकडे 15 दिवसांची सुट्टी मागितली.
कैलास मानसरोवरच्या यात्रेंसाठी राहुल गांधींनी अर्ज केला?
परराष्ट्र मंत्रालय दरवर्षी जून ते सप्टेंबरदरम्यान, दोन वेगवेळ्या रस्त्यांनी (लिपुलेख दर्रा उत्तराखंड आणि नाथु-ला दर्रा सिक्कीम) यात्रेचं आयोजन करते. पण परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार यंदा यात्रेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल होती. अशावेळी राहुल गांधींनी हे स्पष्ट केलं नाही की, त्यांनी यात्रेसाठी अर्ज केला की नाही.
गुजरात निवडणुकीपासून मंदिर डिप्लोमसीला सुरुवात
गुजरात निवडणुकीदरम्यान, राहुल गांधी यांनी सोमनाथ मंदिरसह अनेक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं होतं. त्यावेळी विरोधकांकडून त्यांच्यावर अनेक आरोपही झाले होते. राहुल गांधी हिंदू आहेत की, नाही याचा खुलासा करावा अशी मागणीही विरोधकांनी केली होती. तेव्हा काँग्रेसने राहुल गांधींचा बचाव करत त्यांना शिवभक्त आणि हिंदू म्हणून जाहीर केलं होतं. 12 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी स्वत: राहुल गांधी अनेक मंदिर आणि मठांना भेटी देत आहेत.
राहुल गांधी नाही तर भाजप आणि मोदींना इमेज बदलण्याची गरज : काँग्रेस
कैलास मानसरोवर हा राजकारणाचा भाग नसल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेस प्रवक्ते अखिलेश सिंह यांनी याबाबत बोलताना असं सांगितलं की, ‘राहुल गांधीं यांना इमेज बदलण्याची गरज नाही. इमेज बदलण्याची खरी गरज भाजप आणि नरेंद्र मोदींना आहे. राहुल गांधी हे सर्व धर्मांवर विश्वास ठेवणारे आहेत.’
दरम्यान, राहुल गांधी कैलास मानसरोवर यात्रेला गेल्यास त्यावर राजकारण होण्याची दाट शक्यता आहे.
...म्हणून कैलास मानसरोवर यात्रा करावीशी वाटते : राहुल गांधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Apr 2018 11:46 AM (IST)
‘मी जेव्हा विमानाने कर्नाटकला चाललो होतो त्यावेळी माझं विमान अचानक 8000 फूट खाली आलं. तेव्हा वाटलं की, आमची गाडी जणू काही थांबलीच... ज्यावेळी मी सुखरुप असल्याची मला जाणीव झाली त्यावेळी मला असं वाटलं की, मी कैलास मानसरोवरची यात्रा करावी.’
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -