नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेशच्या अमेठीसह केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस नेते एके एंटनी आणि रणदीप सुरजेवाला यांनी ही घोषणा केली. राहुल गांधींनी दक्षिणेतून निवडणूक लढवावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील नागरिकांकडून केली जात होती, असंही काँग्रेसने सांगितलं.


अमेठी राहुल गांधींची कर्मभूमी आहे. अमेठीसोबत त्यांचा नातं कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे. मात्र दक्षिणेतून वारंवार मागणी होत होती की राहुल गांधींनी केरळ, कर्नाटक किंवा तामिळनाडूतील एका जागेवरुन निवडणूक लढवावी. त्यामुळे त्यांनी केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचं रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं.





भाजपचा हल्लाबोल


भाजपच्या महेश शर्मा यांनी ट्वीट करत म्हटलं की, चांगलं झालं अमेठीच्या जनतेला निर्णय घेणं आणखी सोपं झालं. जनता नामदार नाही तर कामदारला निवडेल. अमेठीमध्ये सिद्ध होईल की भारतात केवळ 'पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स'च चालतो.


वायनाड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे याठिकाणी निवडणूक लढण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला असल्याची माहिती आहे. काँग्रेसने केरळमधील 20 लोकसभा मतदारसंघातील 16 जागांवर निवडणूक लढणार आहे.


गांधी घराणं आणि दोन मतदारसंघ


माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही 1980 मध्ये उत्तरप्रदेशच्या रायबरेली आणि आंध्रप्रदेशचे मेडक येथून निवडणूक लढवली होती. तर सोनिया गांधी यांनीही 1999 मध्ये उत्तरप्रदेशच्या अमेठी आणि कर्नाटकच्या बेल्लारी मधून निवडणूक लढवली होती.


तसेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मोदींनी गुजरातच्या वडोदरासह उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधूनही निवडणूक लढवली होती. त्यांना पराभवाची भीती होती का? असा सवालही काँग्रेसने टीकाकारांना विचारला आहे.