'Modi-Surname' Defamation Case : काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी  मानहानीच्या प्रकरणात सुरत कोर्टात (Gujarat High Court) लेखी स्वरुपात आपला जबाब नोंदवला. मोदी आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी दाखल असलेली मानहानीच्या याचिकेवर शुक्रवारी (4 ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात आपला लेखी जबाब नोंदवला आहे. 'सेशन कोर्टात याप्रकरणाची याचिका प्रलंबित असून त्यावर अद्याप निर्णय यायचा आहे. या शिक्षेकेला स्थगिती मिळण्याची शक्यता असल्याने सुप्रीम कोर्टाने शिक्षेला स्थगिती द्यावी. पुर्णेश मोदी यांनी माझं वक्तव्य ऐकले नाही. त्यामुळे या प्रकरणाला अपवाद समजून निर्णय घ्यावा' असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 


मानहानीच्या प्रकरणात जास्त शिक्षा झाल्यामुळे संसदेचे सदस्यत्व गमवावे लागले. पूर्णेश मोदी हे मुळात मोदी समाजातील नाहीत. यापुर्वी कोणत्याही प्रकरणात शिक्षा झालेली नाही. त्यामुळे माफी न मागितल्याने अहंकारी म्हणणे चुकीचे आहे.  'मोदी आडनाव' टिप्पणीबद्दल माफी मागण्याची गरज नाही. कारण मी दोषी नाहीच. जर त्यांना माफी मागून विषय संपवायचा असता तर त्यांनी ते खूप आधीच केले असते, असे राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या जबाबात म्हटलेय. 


 पूर्णेश मोदी यांनी काय दावा केला ?


मोदी आडनाव बदनामी प्रकरणी तक्रारदार पूर्णेश मोदी यांनी 31 जुलै 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले. पुर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांची याचिका फेटाळण्याची मागणी केली. 


राहुल गांधी यांना दिलासा देण्याचा कोणताही आधार नसल्याचे पूर्णेश मोदी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या जबाबात म्हटले आहे. राहुल गांधी यांचे वागणे अहंकारी व्यक्तीप्रमाणे आहे. कोणत्याही कारणाशिवाय संपूर्ण वर्गाचा अपमान केल्यानंतर त्यांनी माफी मागण्यास नकार दिला, असे पुर्णेश मोदी यांनी म्हटलेय. 


राहुल गांधी सुप्रीम कोर्ट का गेले ?


मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना मार्च 2023 मध्ये सुरत न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. गुजरात उच्च न्यायालयाने 7 जुलै रोजी त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने 21 जुलै रोजी गुजरात सरकारसह संबंधित तक्रारदारला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्यास सांगितले.






राहुल गांधी यांनी काय म्हटले होते ?


13 एप्रिल 2019 रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान कर्नाटकात राहुल गांधी यांनी भाषण करताना मोदी आडनावाबाबत भाष्य केले होते. 'सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का आहे?' असे राहुल गांधी म्हणाले होते. यावरुन भाजपचे नेते पूर्नेश मोदी यांनी सुरत कोर्टात त्यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, 'राहुल गांधींनी असं म्हणत मोदी आडनाव असलेल्या लोकांची बदनामी केली आहे.'  त्याप्रकरणी सुरतमधील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवले. त्यांना दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली होती.