नवी दिल्ली: मोदी सरकार दोन वर्षे कृषी कायद्याला स्थगिती देणार होते, ती स्थगिती त्यांनी कायमची द्यावी आणि त्यासाठी आम्ही मदत करु असे काँग्रेस नेता राहुल गांधी म्हणाले. ते दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.


कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन आणि दिल्लीत झालेला हिंसाचार यावर बोलताना राहुल गांधी मोदी सरकारला उद्देशून म्हणाले की, "तुम्ही दोन वर्षे कृषी कायदे स्थगित करणार होता, ते कायमचे स्थगित करा. वाटल्यास पुन्हा प्रयत्न करा. त्यासाठी आम्ही मदत करु. शेतकऱ्यांशी यावर चर्चा करा, सर्वांशी चर्चा करा. कृषी क्षेत्राला सुधारणांची गरज आहे हे तर आम्ही पण मान्य करतो."


शेतकऱ्यांवर लाठीमार करुन पंतप्रधान देशाला दुबळे बनवत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. राहुल गांधींनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर सडकून टीका केली.


Sanjay Raut | दिल्ली हिंसाचार हा शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीचा पूर्वनियोजित कट -संजय राऊत


राहुल गांधी म्हणाले की, "मोदी सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर लाठीमार करतंय. शेतकऱ्यांनी एक इंचही मागे हटू नये, आम्ही तुमच्या सोबत आहोत."


शेतकऱ्यांना लाल किल्याकडे कोणी जाऊ दिलं असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून उत्तर मागितलं आहे. राहुल गांधी म्हणाले की, "हे आंदोलन आता शहरांकडून गावात पसरेल. शेतकऱ्यांवर लाठीमार केल्याने हे आंदोलन मोडीत निघेल असा विचार पंतप्रधानांनी करु नये."


प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान मोठा हिंसाचार झाला होता. यामुळे शेतकरी आंदोलनात फूट पडली आहे. दिल्ली पोलिसांनी या हिंसाचाराचा तपास सुरु केला असून त्यासंबंधी 44 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि 44 लोकांविरोधात लुकआउट नोटिस बजावली आहे. या हिंसाचारात 394 पोलीस जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय.


प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला मंजूरी देण्यात आली होती. त्यावेळी दिल्लीत मोठा हिंसाचार झाला. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रॅन्च करत आहे.


या प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांनी गुरुवारी गाजीपूर बॉर्डरवर प्रदर्शन करत असलेल्या शेतकऱ्यांना ती जागा सोडण्यास सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या या आदेशाला विरोध दर्शवला आहे. शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी जाहीर केलं आहे की ते आत्महत्या करतील पण आंदोलन स्थळ सोडणार नाहीत. त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.


शशी थरुर आणि सहा पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, हिसांचारासंबंधी खोटी माहिती पसरवल्याचा आरोप