Rahul Gandhi Speech in Loksabha: राहुल गांधींच्या (Congress Leader Rahul Gandhi) संसदेतल्या भाषणाचा बराचसा भाग कामकाजातून वगळण्यात आला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलं होतं. त्यांचा रोख हा पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि अदानी (Adani Group) यांच्यावर होता. राहुल गांधीच्या भाषणातून नेमका हाच भाग वगळला गेला आहे. तसेच, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान काही प्रश्नही विचारले होते. त्यापैकी काही प्रश्नही लोकसभेच्या (Lok Sabha) कामकाजातून वगळण्यात आले आहे. 


लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अदानींच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे नाव घेत अनेक आरोप केले. राहुल गांधींच्या भाषणावर सत्ताधारी पक्षाकडूनही अनेक आरोप करण्यात आले होते. पण राहुल गांधींच्या भाषणातील काही भाग आता सभागृहाच्या कामकाजातून वगळण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना लोकसभेत लोकशाही गाडली गेली, असं ट्वीट काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केलं आहे. आपल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले होते की, "एकत्र येणं म्हणजे सुरुवात, एकोप्यानं राहणं म्हणजे प्रगती आणि एकत्र काम करणं म्हणजे प्रगती, अदानीजी आणि नरेंद्र मोदीजी, धन्यवाद." त्यांच्या भाषणाचा हा भाग सभागृहाच्या कामकाजातून वगळण्यात आला आहे. 


आपल्या भाषणादरम्यान प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले होते की, "आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की, त्यांचा भारताच्या पंतप्रधानांशी काय संबंध आहेत? यानंतर राहुल गांधींनी संसदेत एक जुना फोटोही दाखवला आणि म्हणाले. मला हा फोटो पाहायचा होता. हा फोटो सार्वजनिक आहे." राहुल गांधींच्या भाषणाचा हा भागही कामकाजातून वगळण्यात आला आहे.


राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले होते की, "अदानींच्या मुद्यावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. आज सगळीकडे अदानींचे नाव आहे. रस्ता कोणी बांधला तर अदानींचे नाव समोर येईल. हिमाचलमधील सफरचंदावरदेखील अदानींचे नाव असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे संबंध कसे आहेत, हे देशाला जाणून घ्यायचे असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने फोटो सभागृहात झळकावले. त्यावरून सत्ताधारी भाजपने सभागृहात जोरदार गोंधळ घातला. अदानी हे 2014 मध्ये सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत 609 क्रमांकावर होते. त्यानंतर 9 वर्षात थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहचले. ही जादू मोदीजी दिल्लीत आल्यानंतर सुरू झाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला."


"तरुण आम्हाला विचारत आहेत की अदानी फक्त 8-10 सेक्टरमध्ये आहे. अशा परिस्थितीत त्यांची संपत्ती 2014 मध्ये 8 अब्ज डॉलरवरून 2022 मध्ये 140 अब्ज डॉलरवर कशी पोहोचली?", असा प्रश्न विचारत आहेत. 


अदानी आणि पंतप्रधानांवरील उपस्थित केलेले प्रश्नही कामकाजातून वगळले


राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात काही प्रश्न उपस्थित केले होते. तसेच काही प्रश्न त्यांनी थेट पंतप्रधानांना विचारले होते. ते म्हणाले होते की, "मला पंतप्रधान मोदींना दोन-तीन प्रश्न विचारायचे आहेत. आधी पंतप्रधान मोदी अदानीच्या विमानात जायचे. आता अदानी पीएम मोदींच्या विमानात जातात. राहुल गांधी यांनी 'पीएम मोदींच्या विदेश दौऱ्यात तुम्ही आणि अदानी किती वेळा एकत्र गेलात, 'तुम्ही अदानींला किती वेळा भेटलात?, तुमच्यासोबत अदानी किती परदेश दौऱ्यावर आले? तुमच्या भेटीनंतर अदानींना किती देशांमध्ये कंत्राट मिळाले?", असे प्रश्न राहुल गांधी उपस्थित केले होते.