नवी दिल्ली: भारत आणि चीन या दोन्ही देशांनी लडाखच्या सीमेवरुन आपापले सैन्य माघार घ्यायचे ठरवले आहे. आता या प्रश्नावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक झाले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशाच्या लष्कराला फसवत असल्याचा आरोप केला आहे. तसेच पंतप्रधानांनी चीनला भारतीय भूप्रदेश का दिला ते सांगावं अशीही मागणी त्यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनला घाबरले असून त्यांनी भारतीय लष्कराला धोका दिला असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच पंतप्रधानांनी चीनला भारतीय भूप्रदेश दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, "गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लडाखच्या परिस्थितीवर निवेदन दिलं. मोदींनी भारतीय भूप्रदेश चीनला का दिला याचं उत्तर त्यांनी आणि संरक्षण मंत्र्यांनी द्यावं. भारतीय लष्कराला कैलास रेंजच्या मागे हटण्याचा आदेश देण्यात आला आहे का? देप्सांग प्लेनपासून चीन मागे का गेला नाही? भारतीय भूप्रदेश फिंगर चार पर्यंत आहे. मोदींनी फिंगर चार आणि फिंगर तीनची जमीन चीनला दिली आहे."
राहुल गांधी पुढे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला भारतीय भूप्रदेश दिला ही वस्तुस्थिती आहे. मोदी चीनला घाबरले आहेत. चीनने भारतीय भूप्रदेशावर कब्जा केला आहे. त्यावर संरक्षण मंत्री काहीही बोलत नाहीत."
गुरुवारी संसदेत निवेदन देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते की, "भारत आपली एक इंच भूमीही कोणाला घेऊ देणार नाही. सप्टेंबर 2020 पासून भारत आणि चीनमध्ये वाद निवळण्यासाठी चीनसोबत विविध स्तरावर चर्चा सुरु आहे. पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडील भागात सहमती झाली आहे. दोन्ही देशाच्या सैन्यांनी सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. चीन फिंगर 8 आणि भारत फिंगर 3 या सीमेवर असेल. भारत-चीन सीमेवर पूर्वीसारखी स्थिती बनवण्यात येईल. सध्या पेट्रोलिंग बंद असेल. द्विपक्षीय स्तरावर चर्चेनंतरच एलएसीवर पेट्रोलिंग केलं जाईल. काही मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये मतमतांतर कायम असून त्यावर चर्चा सुरू आहे."
शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीन सीमेवरील सैन्य माघारी परतणार : राजनाथ सिंह