Bihar elections 2020 : बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी म्हणजेच एकूण 71 जागांसाठी मतदान सुरु झालं आहे. मतदान सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान, 4 जागांसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत, 26 जागांसाठी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आणि 5 जागांसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.


पहिल्या टप्प्यात आठ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला


पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्याव्यतिरिक्त आठ मंत्री प्रेम कुमार, कृष्णनंदन वर्मा, शैलेश कुमार, विजय कुमार सिन्हा, जय कुमार सिंह, रामनारायण मंडल, संतोष कुमार निराला आणि बृजकिशोर बिंद यांच्यासह अनेक दिग्गज निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत.


31 हजार 371 मतदान केंद्र तयार करण्यात आली


पहिल्या टप्प्यात 1066 उमेदवारांच्या भवितव्याचा आज निर्णय होणार आहे. ज्यापैकी 114 महिला आहेत. दोन कोटी 14 लाखांहून अधिक मतदार या निवडणुकीत आपलं मत नोंदवणार आहेत. बिहार निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात 31 हजार 371 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत.


कोणत्या पक्षाचे किती उमेदवार?


पहिल्या टप्प्यामध्ये आरजेडीच्या 42 तर जदयूच्या 35 उमेदवारांव्यतिरिक्त भाजपचे 29, काँग्रेसचे 21, भाकपाचे आठ, हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे सहा आणि विकासशील इंसान पार्टी (वीआयपी) चे एक उमेदवार मैदानात उतरले आहेत. याव्यतिरिक्त एलजेपीच्याही 42 उमेदवारांचं भवितव्य या टप्प्यात ठरणार आहे.


एका वोटिंग सेंटरवर 1000 मतदार असतील


कोरोनाच्या संकटात पार पडणाऱ्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. निवडणुकीसाठी आयोगाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे एका वोटिंग सेंटरवर मतदारांची संख्या 1600 वरून कमी करत 1000 करण्यात आली आहे.


80 हून अधिक वयाच्या लोकांसाठी पोस्टल बॅलेट


वयोवृद्ध मतदारांसाठी आपलं मत नोंदविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सॅनिटाइज करणं, मतदारांसाठी मास्क आणि सुरक्षेविषयक साहित्य आणि थर्मल स्कॅनर, हँड सॅनिटायझर, साबण आणि पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे.