Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून नवा वाद सुरू झालाय. शुक्रवारी त्यांनी भाजप आणि आरएसएसला जय सियाराम म्हणण्याचा सल्ला देत जय श्री राम आणि जय सियाराममधील फरक सांगितला. त्यांच्या वक्तव्यावर आता भाजपने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


 भाजपला राहुल गांधींच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ते निवडणूकवाले हिंदू आहेत, असा टोला शाहनवाज हुसेन यांनी लगावला आहे. तर ब्रजेश पाठक यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी हे नाट्य मंडळाचे नेते आहेत. ते त्यांच्या कोटवर जाणवं घालतात. त्यांना भारतीय संस्कृतीबद्दल काहीच माहिती नाही. फक्त रस्त्यावरून रस्त्यावर धावत आहे. कारण जनतेने त्यांना नाकारले आहे. 


राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शुक्रवारी मध्य प्रदेशातील आगर-माळवा येथे होती. यावेळी आगर येथील एका सभेला संबोधित करताना त्यांनी ‘जय श्री राम’, ‘जय सियाराम’ आणि ‘हे राम’ या घोषणांचा आपल्या खास शैलीत अर्थ लावला.  'जय सियाराम' म्हणजे काय? जय सीता आणि जय राम म्हणजे सीता आणि राम एकच आहेत. त्यामुळे जय सियाराम किंवा जय सीताराम असा नारा आहे. प्रभू राम सीताजींच्या सन्मानासाठी लढले. आपण जयासियाला राम म्हणतो आणि सीतेसारख्या महिलांचा समाजात आदर करतो.
जय श्री राम यामध्ये आपण भगवान रामाचा जयजयकार करतो. भाजपवाले जय श्री राम म्हणतात, पण जय सियाराम आणि हे राम का म्हणत नाहीत? प्रभू राम ज्या भावनेने आपले जीवन जगले त्या भावनेने आरएसएस आणि भाजपचे लोक आपले जीवन जगत नाहीत. रामाने कोणावरही अन्याय केला नाही. समाजाला जोडण्याचे काम रामाने केले. रामाने सर्वांना आदर दिला. आरएसएस आणि भाजपचे लोक प्रभू रामाच्या जीवनपद्धतीवर चालत नाहीत, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. 


भाजपवाले सियाराम आणि सीताराम म्हणू शकत नाहीत, कारण त्यांच्या संघटनेत एकही महिला नाही. त्यांच्या संघटनेत सीता येऊ शकत नाही, कारण सीतेला त्यांनी हाकलून दिले आहे. मी आरएसएसच्या लोकांना सांगू इच्छितो की जय श्री राम, जय सियाराम आणि हे राम म्हणा. सीताजींचा अपमान करू नका, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी भाजपवल केलाय. 


राहुल गांधी म्हणाले, "गांधीजी हे राम म्हणायचे. गांधीजींचा नारा हे राम होता. हे राम म्हणजे काय? राम म्हणजे राम ही एक जीवनपद्धती होती, प्रभू राम ही केवळ एक व्यक्ती नव्हती, जीवन जगण्याची पद्धत, प्रेम, बंधुता, आदर, तपश्चर्या, त्यांनी संपूर्ण जगाला जगण्याचा मार्ग शिकवला. गांधीजी हे राम म्हणायचे, म्हणजे प्रभू राम ही भावना आपल्या हृदयात आहे. आणि त्याच भावनेने आयुष्य जगायचे असते."