Ban mobile in temples: तामिळनाडूतील मंदिरात मोबाईल फोन वापरावर बंदी घालण्याचे निर्देश मंद्रास उच्च न्यायालयाने दिले आहेत. मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य कायम ठेवण्यासाठी मोबाईलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचं कोर्टानं सांगितलं. तूतीकोरिन जिल्ह्यातील तिरुचेंदूर येथील सुब्रमण्यम स्वामी मंदिरात मोबाईल फोन वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावेत, त्यासाठी एम. सीतारमन यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मद्रास हायकोर्टानं हा महत्वाचा निर्णय दिलाय.  


टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, याचिकाकर्ताने याचिकात म्हटलेय की भक्त मंदिरात मूर्ती आणि पूजेचे फोटो घेतात. हे मंदिराच्या नियमांच्या विरोधात आहे. तिरुचेंदूर मंदिरात मोबाईल फोन वापरावर बंदी असावी. या याचिकेवरवर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने संपूर्ण तामिळनाडूमधल्या मंदिरांमध्ये मोबाईल फोन वापरावर बंदी लागू करण्याचे निर्देश तामिळनाडू सरकारला दिले आहेत. यावेळी मंदिरात शुद्धता आणि पावित्र्य राखण्यासाठी हे निर्देश दिल्याचंही कोर्टाकडून नमूद करण्यात आलं आहे.


मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती आर महादेवन आणि न्यायमूर्ती जे सत्य नारायण प्रसाद यांच्या खंडपिठानं मंदिरात मोबाईल वापरावर बंदी घालण्याचा निर्णय दिलाय. हाईकोर्टाने म्हटले की,  गुरुवायुरमध्ये श्री कृष्ण मंदिर, मदुरैमध्ये मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर आणि तिरुपतीमध्ये श्री वेंकटेश्वर मंदिर या ठिकाणी मोबाईलवर बंदी आहे. येथे काठेकोरपणे मोबाईल वापरला जात नाही, हे इतरांसाठी चांगलं उदाहरण आहे. 


मोबाईल फोन आणि कॅमेऱ्याचा वापर मंदिरात निषिद्ध असल्याचे पोस्टर, बोर्ड मंदिरात आणि मंदिर परिसरात ठिकठिकाणी लावण्यात आल्याची माहिती याचिका कर्त्यांकडून मद्रास हायकोर्टात देण्यात आली. तसेच, मंदिरात येणाऱ्या भक्तांनी योग्य पद्धतीने पेहेराव करणं आवश्यक असल्याचेही सांगण्यात आलेय. यावर निकाल देताना कोर्टाने फक्त  सुब्रह्मण्यम स्वामी मंदिरातच नव्हे, तर तामिळनाडूमधील सर्वच मंदिरांमध्ये मोबाईल फोनच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, भक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून मंदिराच्या बाहेरच मोबाईल फोन ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था करण्यात यावी. तसेच आदेशाचं पालन व्यावस्थित करण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे सांगण्यात आलेय.  






ही बातमी देखील वाचा


Maharashtra Politics: कोकणात दिवाळीत राजकीय वातावरण तापलं; वैभव नाईकांचे निलेश राणेंना विधानसभा निवडणुकीत उभे राहण्याचे आव्हान