Rahul Bharat Jodo Yatra: कोणी जर तुम्हाला येऊन सांगितलं की, मी स्वतःला खूप आधीच सोडून दिलंय, तर आश्चर्य वाटेल ना? आणि जर हे वाक्य राहुल गांधींसारख्या एका मोठ्या नेत्यानं म्हटलं असेल तर? भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसचे (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हे वक्तव्य केलं आहे. "भाई साहब, राहुल गांधी को मैंने सालों पहले छोड दिया है", असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींच्या या वक्तव्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसलेला नाही, तर सर्वजण हैराणही झाले आहेत. नेमकं असं राहुल गांधी का म्हणाले? असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान, सध्या भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशात आहे. 


"भाई साहब, राहुल गांधी को मैंने सालों पहले छोड दिया है"


मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये माध्यम प्रतिनिधींनी राहुल गांधींना भारत जोडो यात्रेशी संबंधित एक प्रश्न विचारला. काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी या प्रतिनिधीला मध्येच तोडत, वेगळ्याच अंदाजात एक वक्तव्य केलं. ते म्हणाले की, "भाई साहब, राहुल गांधी को मैंने सालों पहले छोड दिया है. राहुल गांधी दिमाग में है, मेरे दिमाग में नहीं."






दोन ते तीन वेळा राहुल गांधींनी हे उत्तर दिलं आणि त्यानंतर राहुल गांधींनी माध्यमाच्या प्रतिनिधीला प्रश्न विचारायला सांगितलं. त्यावेळी राहुल गांधींना प्रश्न विचारण्यात आला की, त्यांचा हा जो मास कनेक्ट प्रोग्राम आहे. म्हणजेच, भारत जोडो यात्रा, हे खूप पूर्वीच सुरु करायला हवी होती का? या प्रश्नाचं उत्तरही राहुल गांधींनी वेगळ्या शैलीत दिलं. राहुल गांधी म्हणाले की, "गोष्टी योग्य वेळीच होतात. जेव्हा योग्य वेळ येते, तेव्हाच त्या गोष्टी घडतात. त्यापूर्वी काहीच होत नाही." 


वयाच्या 25व्या वर्षीच सुचलेली कल्पना 


यावेळी बोलताना राहुल गांधी यानी माहिती दिली की, भारत जोडो यात्रेसारख्या कार्यक्रमाची कल्पना त्यांच्या मनात वयाच्या 25व्या वर्षीच पहिल्यांदाच आली होती. सध्या सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेचे वर्षभरापूर्वी तपशीलवार नियोजन राहुल गांधींनी केलं होतं. राहुल गांधी म्हणाले की, कोरोना आणि इतर कारणांमुळे त्यावेळी यात्रा  होऊ शकली नाही. ते पुढे म्हणाले की, भारत जोडो यात्रेची ही सर्वोत्तम वेळ आहे.


याच पत्रकार परिषदेत काँग्रेस नेत्यानं राजस्थान प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन पायलट आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील वादावरही वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांना पक्षाची संपत्ती म्हणून संबोधलं आणि कोणत्याही नेत्याच्या वक्तृत्वाचा भारत जोडो यात्रेवर परिणाम होणार नाही, असंही सांगितलं. यादरम्यान राहुल गांधी यांनी अमेठीतून पुन्हा निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचं टाळलं. याचे उत्तर दीड वर्षानंतर मिळणार असून, आता त्यांचं संपूर्ण लक्ष भारत जोडो यात्रेकडे असल्याचं त्यांनी सांगितलं.