'महात्मा गांधींची हत्या ज्या विचारसरणीने केली, त्याविरोधात माझा लढा आहे. महात्मा गांधींचा फोटो ज्यांनी कॅलेंडरवरुन हटवला त्यांच्याविरोधातही आहे.' असं राहुल गांधी म्हणाले. सामान्य माणसांवर हुकूमशाही लादणाऱ्या मूठभर माणसांविरोधात आपली लढाई असल्याचंही राहुल गांधींनी सांगितलं. सरकारविरोधी लढ्यासाठी तयार राहण्याचं आवाहनही राहुल यांनी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना केलं.
राहुल गांधी यांना भिवंडी कोर्टात हजर राहावं लागलं. महात्मा गांधींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवून आणली, असं वक्तव्य राहुल गांधींनी जाहीर सभेत केलं होतं. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 मार्चला होणार आहे. त्या दिवशी राहुल गांधींची साक्ष नोंदवली जाणार आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी 15 व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत केले होते. यानंतर संघाचे शहर जिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.