रमजान महिन्यात मतदानाला मुस्लिम धर्मगुरुंचा विरोध, निवडणुकांच्या तारखांवरुन नव्या वादाला सुरुवात
एबीपी माझा वेब टीम | 11 Mar 2019 01:20 PM (IST)
लोकसभा निवडणूकीचे शेवटचे तीन टप्पे रमजान महिन्यात येत असल्याने मुस्लीम धर्मगुरुंनी या तारखांना विरोध केला आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीचे शेवटचे तीन टप्पे रमजान महिन्यात येत असल्याने मुस्लीम धर्मगुरुंनी या तारखांना विरोध केला आहे. रमजान महिन्यात मतदान ठेवल्याने मतदानाचा टक्का घसरु शकतो, त्यामुळे शेवटच्या तीन टप्प्यातील मतदानाच्या तारखा बदलण्यात याव्यात अशी मागणी मुस्लिम धर्मगुरुंनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शेवटच्या तीन टप्प्यात 6, 12 आणि 19 मे रोजी मतदान होणार आहे. या तीनही तारखा रमजान महिन्यात येतात. या काळात मुस्लिम धर्मियांचा उपवास असतो. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरु शकतो असं मुस्लिम धर्मगुरुंचं म्हणणं आहे. त्यामुळे याकाळात मतदान घेऊ नये अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभा निवडणूकीचं वेळापत्रक काल निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे. शेवटच्या तीन टप्प्यांपर्यंत उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांत मतदान होणार आहे. या तीनही राज्यांमध्ये मुस्लिम मतदारांचं प्रमाण लक्षणीय आहे. संबंधित बातम्या लोकसभा निवडणूक 2019 | महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान, मतमोजणी 23 मे रोजी पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, ट्विटरवरुन माहिती