मुंबई : भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा 26 सप्टेंबरचा मुंबई दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे शाहांच्या उपस्थितीत भाजप-शिवसेना युतीची घोषणा होण्याची शक्यताही आता मावळली आहे.


आधीचं शिवसेना-भाजप युतीचं घोडं अडकलं आहे. त्यातचं अमित शाहांचा दौरा रद्द झाल्य़ामुळे 26 सप्टेंबरला युतीच्या घोषणेच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होतं आहे. लोकसभेला अमित शाहांच्या उपस्थितीत युतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार विधानसभेसाठीही शाहांच्या उपस्थितीत युतीची घोषणा होणार अशी चर्चा सुरु होती. पण शाहांचा दौरा रद्द झाल्यानं युतीचं काय हा प्रश्नही कायम आहे.

VIDEO | शिवसेना-भाजप युतीच्या घोषणेचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर | ABP Majha



दरम्यान शिवसेना-भाजप युतीचं घोडं अवघ्या 10 जागांमुळे अडल्याची सूत्रांची माहिती आहे. काल उशिरा रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तब्बल साडेतीन तास चाललेल्या बैठकीत युतीच्या जागांबाबत तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे युतीच्या घोषणेचा आजचा मुहूर्त पुन्हा एकदा टळला आहे.

तसेचं पक्षांतर बंडाळी टाळण्यासाठी युतीची घोषणा लांबणीवर पडल्याचं आणखी एक प्रमुख कारण सांगितलं जात आहे. युती नाही झाली तर दोन्ही पक्षातील इच्छूक उमेदवारांना एका जागेवर संधी मिळू शकते. मात्र युती झाल्यास एका पक्षातील इच्छूक उमेदवाराला त्या जागेवर पाणी सोडावं लागेल. त्यामुळे नाराजीनाट्य, बंडखोरी किंवा पक्षांतरणामुळे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे पक्षाचे एबी (AB) फॉर्म वाटप करताना वाद टाळण्यासाठी युतीच्या घोषणेची घाई नको, असा सूर वरिष्ठ पातळीवर असल्याचं कळतंय.