Bharat Jodo Nyaya Yatra : काँग्रेसची (Congress) भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु आहे. सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) जात आहे. मात्र, शनिवारी राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा अर्धवट सोडून अचानक वायनाडला रवाना झाले. शनिवारी राहुल गांधी यांचा यात्रेचा मार्ग वाराणसी ते उत्तर प्रदेशातील भदोही असा होता. पण, राहुल गांधी अचानक वायनाडला गेले असून, त्यांनी प्रवास अर्ध्यावरच थांबवला आहे. राहुल गांधी यात्रेमधूनच अचानक निघून गेले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी राहुल गांधी वायनाडला जाणार असल्याची माहिती दिली आहे.


'प्रयागराजहून पुन्हा सुरू होणार प्रवास'


सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहुल गांधी यांच्या वायनाड भेटीची माहिती देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी लिहिलं की, वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीची नितांत गरज आहे. ते आज सायंकाळी 5 वाजता वाराणसीहून रवाना होत आहेत. भारत जोडो न्याय यात्रा रविवारी 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता प्रयागराजमध्ये पुन्हा सुरू होईल.




राहुल गांधी यांच्या संसदीय मतदारसंघाला भेट देण्यामागचं कारण समोर आलं आहे. शुक्रवारी सकाळी जंगली हत्तीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा शनिवारी कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. या व्यक्तीबाबत माहिती देताना वन अधिकाऱ्याने सांगितलं की, पीडित महिला वनविभागाची इको-टूरिझम गाइड होती. कुरुवा बेट या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.


काशीमध्ये राहुल गांधी यांना विरोध


काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शुक्रवारी यूपीच्या सीमेवर पोहोचली. चंदौली येथेही त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यासोबतच शनिवारी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ काशी येथे पोहोचले आहेत. पंतप्रधा नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला असलेल्या काशीमध्ये राहुल गांधींच्या न्याय यात्रेला जोरदार विरोध करण्यात आला. राहुल गोलगड्डा येथून प्रवास सुरू करून हरतीरथ चौकाजवळ पोहोचले, तेव्हा काही तरुणांनी प्रभू श्रीरामाचे बॅनर, भगव्या रंगाचे झेंडे दाखवून जय श्री रामच्या घोषणा देत जोरदार निषेध केला.