नवी दिल्ली : आजारी सोनिया गांधींना भेटण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी अमेरिकेला रवाना झाले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरु आहेत. त्यामुळे सोनियांवरील उपचारांदरम्यान राहुल गांधी त्यांच्यासोबत असतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे.

सोनिया गांधींची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नाही. त्यामुळेच त्या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारातही दिसल्या नाही. विधानसभा निवडणूक निकालाच्या आधीच त्या अमेरिकेला रवाना झाल्या होत्या.

https://twitter.com/INCIndia/status/842311348113575937

राहुल गांधी सोनियांसोबतच अमेरिकेहून परतणार आहेत. मात्र उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील पराभवानंतर राहुल गांधी परदेशात जात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अनेक महिन्यांपासून सोनिया गांधी आजारी
याआधी 2 ऑगस्टला वाराणसी या मतदारसंघातील रोड शो दरम्यान आजारी पडल्यानंतर सोनिया गांधी राजकारणात फारशा सक्रिय नाहीत. वाराणसीहून त्यांना विमानाने दिल्ली आणून सैन्याच्या रिचर्स अँट रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सर गंगा राम रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलं. तापामुळे नोव्हेंबर महिन्यातही सोनिया गांधींना सर गंगाराम रुग्णालयात भर्ती केलं होतं. काही दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला होता.

पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागला. तर पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वात काँग्रेसने चांगंल यश मिळवलं.

मणिपूर आणि गोव्यात मोठा पक्ष असतानाही काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं. त्यामुळे काँग्रेसच्या अनेक आमदारांनी काँग्रेस नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. तर गोव्यातील काँग्रेसचे आमदार विश्वजीत राणे यांनी आमदारकीचा राजीनामाही दिला आहे.

दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनीही काँग्रेसने नेतृत्व बदलणं ही काळाची गरज असल्याचं म्हटलं आहे. तर काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनीही काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्याचं म्हणत संघटनेत बदल करण्याची मागणी केली होती.