राहुल गांधी यांचा 'सिंघम' अवतार, उत्तर प्रदेशात पोस्टर
एबीपी माझा वेब टीम | 03 May 2016 04:18 AM (IST)
गोरखपूर : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना 'सिंघम' स्टाईलमध्ये दाखवणारं एक पोस्टर उत्तर प्रदेशातील हौशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तयार केलं आहे. गोरखपूर शहरात ठिकठिकाणी हे राहुल गांधींचं पोस्टर झळकत आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशात काँग्रेस सरकार स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ही पोस्टरबाजी केली आहे. एकीकडे राहुल गांधींना अजय देवगनसारख्या 'सिंघम' स्टाईलमध्ये दाखवलं गेलं असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, बसपाच्या मायावती, भाजपचे यूपी प्रदेशाध्यक्ष राहुल केशव प्रसाद मौर्य आणि एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसी यांना राहुल गांधींची माफी मागताना दाखवलं आहे. 'उत्तर प्रदेशला 27 वर्षांपासून लुटणाऱ्यांनो, सावध व्हा. कारण आम्ही 2017 मध्ये सुशासन घेऊन येत आहोत' असा मथळा पोस्टरवर दिसत आहे.