Rahul Gandhi In Karnataka : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी (7 मे) कर्नाटकची राजधानी बंगळुरु (Bengaluru) इथे कंत्राटी कामगार आणि डिलिव्हरी पार्टनर्ससह संवाद साधला. त्यांनी विविध कंपन्यांच्या कंत्राटी कामगार आणि डिलिव्हरी पार्टनर्सच्या समस्या ऐकून घेतल्या. यासोबतच राहुल गांधींनी या कामगारांसोबत मसाला डोसा आणि कॉफीच्या नाश्ताचाही आनंद लुटला.


बेरोजगारीमुळे आपल्याला कमी पगाराच्या नोकऱ्या कराव्या लागत असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी कर्मचाऱ्यांशी खेळाविषयी देखील चर्चा केली आणि त्यांना त्यांच्या आवडत्या फुटबॉल खेळाडूंबद्दल विचारलं. स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि डंझो सारख्या फूड कंपन्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्स बंगळुरुमध्ये  राहुल गांधी यांच्यासोबत जेवण करताना दिसले.


राहुल गांधींनी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या


काँग्रेसने ट्वीट केलं आहे की, "राहुल गांधी यांनी बंगळुरुमधील प्रतिष्ठित एअरलाईन्स हॉटेलमध्ये कंत्राटी कामगार आणि डंझो, स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट इत्यादींच्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांच्या पार्टनर्ससह संवाद साधला. मसाला डोसा आणि कॉफीचा नाश्ता करताना त्यांनी फूड डिलिव्हरी पार्टनर्सचे आयुष्य, स्थिर रोजगाराचा अभाव आणि मूलभूत वस्तूंच्या वाढत्या किमती यावर चर्चा केली. या तरुणांनी कंत्राटी नोकऱ्या का स्वीकारल्या आणि त्यांची कामाचं स्वरुप, स्थिती काय आहे हे देखील राहुल त्यांनी जाणून घेतलं."






राहुल गांधींच्या रोड शोबाबत भाजपचा आरोप


यानंतर राहुल गांधी यांनी बंगळुरुमधील त्यांच्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी दुचाकीचा वापर केला. दुसरीकडे, भाजपने राहुल गांधींच्या बंगळुरुमधील रोड शो आणि सभांची खिल्ली उडवली. सर्वाधिक अल्पसंख्याक लोकसंख्या असलेल्या भागात राहुल गांधींनी रोड शो घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे. 


दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Election 2023) बुधवारी म्हणजेच 10 मे रोजी मतदान होणार असून शनिवारी म्हणजेच 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीत एकूण 5,21,73,579 मतदार मतदान करणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.