नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने पेट्रोलचे दर प्रती लिटर 79 रुपये आणि डिझेलचे दर प्रती लिटर 65 रुपयांवर पोहोचले आहेत. दररोज बदलणाऱ्या किंमतींनुसार, मुंबईत आजचे पेट्रोलचे दर 79.06 रुपये प्रती लिटर, तर डिझेलचे दर 65.74 रुपये प्रती लिटर आहेत.


मुंबईतील पेट्रोल, डिझेलचे दर

राजधानी दिल्लीत डिझेलचे दर 61.74 रुपये प्रती लिटर, तर पेट्रोलचे दर 71 रुपये प्रती लिटर आहेत. मात्र मुंबईत पेट्रोलचे दर 79.06 रुपये प्रती लिटर, तर डिझेलचे दर 65.74 रुपये प्रती लिटर आहेत. राजधानी दिल्लीतील ही ऑगस्ट 2014 नंतरची सर्वात उच्चांकी किंमत आहे. पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारे विविध सेल्स टॅक्स किंवा व्हॅटमुळे या दरांमध्ये फरक आहे.

एका महिन्यात डिझेल 3.40 रुपयांनी महागलं

12 डिसेंबर 2017 नंतर इंधनाच्या किंमतीत सलग वाढ होत गेल्याचं तेल कंपन्यांचं म्हणणं आहे. 12 डिसेंबर रोजी दिल्लीत डिझेलची किंमत 58.34 रुपये प्रती लिटर होती, जी आता 61.74 रुपये प्रती लिटर आहे. याच काळात पेट्रोलच्या किंमतीत 2 रुपयांनी वाढ झाली आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीही वाढल्या

जागतिक स्तरावरील कच्च्या तेलाचे दोन प्रमुख ब्रँड ब्रेंट आणि वेस्ट टेक्सास इंटिमीडिएट (WTI) यांच्या दरातही डिसेंबर 2014 नंतर मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ब्रेंट 70.05 डॉलर प्रती बॅरल, तर WTI चा दर 64.77 डॉलरवर पोहोचला आहे.

एक्साईज ड्युटी घटवण्याची मागणी

कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर भडकले आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एक्साईज ड्युटीत कपात करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. केंद्र सरकारने आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात केवळ एकदा एक्साईज ड्युटी घटवली आहे. ऑक्टोबरमध्ये इंधनाचे दर भडकले होते, तेव्हा केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर 2 रुपये एक्साईज ड्युटी कमी केली होती.