मेहसाणा : गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहारा समुहाने 40 कोटी रुपये दिल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलाय. मोदींचं होमग्राऊंड असलेल्या गुजरातमधील मेहसाणामध्ये राहुल गांधींची सभा पार पडली. या सभेत राहुल गांधींनी मोदींवर आरोपांचा भडीमार केला.


नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाराने त्यांना 6 महिन्याच्या कालावधीत 9 वेळा पैसे दिल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. 22 नोव्हेंबर 2014 रोजी आयकर विभागाने सहारावर टाकलेल्या छाप्यात महत्त्वाची कागदपत्र हाती लागली आहेत. त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी राहुल गांधींनी केली आहे.

इतकेच नव्हे तर बिर्ला समुहावरील छाप्यात आयकर विभागाला एक डायरी आढळली होती. यात 'गुजरात सीएम 25 कोटी' असा उल्लेख आढळल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. आता या सर्व आरोपांची चौकशी करण्याची मागणी राहुल गांधींनी केली आहे.

भाजपचं प्रत्युत्तर

राहुल गांधींना कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांना पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची सवय झाली असून खोट्या आरोपांच्या आधारावर काँग्रेस अस्तित्वाची लढाई लढत आहे, असं प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आलं आहे.

प्रकरण सुप्रीम कोर्टातही

दरम्यान राहुल गांधींनी मोदींवर जे आरोप लावले आहेत, ते प्रकरण अगोदरच सुप्रीम कोर्टातही गेलं आहे. मात्र राहुल गांधींनी आज सादर केलेल्या पुराव्यांना कोर्टाने अवैध होतं. एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीविरोधात गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. मात्र हे प्रकरण पुढे चालवण्यासाठी आवश्यक पुरावे नाहीत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं.

प्रशांत भूषण यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे.

काँग्रेसचा होमग्राऊंडवरच मोदींना घेरण्याचा डाव

दरम्यान काँग्रेसकडून राहुल गांधींच्या सभेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांच्याचसमोर आव्हान उभं करण्याची रणनिती असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी मेहसाणामधील दिसामध्ये शेतकऱ्यांना संबोधित केलं होतं.

त्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत राहुल गांधींकडून आपला संदेश पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे पाटीदार समाजामध्येही आपलं स्थान निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.