Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: नवी दिल्ली : काँग्रेस (Congress Leader) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वात सध्या पक्षाची 'भारत जोडो न्याय यात्रा' (Bharat Jodo Nyay Yatra) सुरू आहे. देशातील अनेक राज्यांमधून या यात्रेचा प्रवास सुरू आहे. सध्या ही यात्रा उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) आहे, मात्र आज काही काळासाठी ही यात्रा थांबवली जाणार आहे. याचं कारण म्हणजे, 2018 च्या एका खटल्यात राहुल गांधींना सुलतानपूरच्या स्थानिक न्यायालयात हजर राहावं लागणार आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, मंगळवारी सकाळी राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात सुलतानपूरच्या स्थानिक न्यायालयात हजर राहायचं असल्यानं भारत जोडो न्याय यात्रा काही काळ थांबवण्यात येणार आहे. जयराम रमेश यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की, भारत जोडो न्याय यात्रेला सोमवारी 37 दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु, ही यात्रा मंगळवारी सकाळी काही काळ थांबेल आणि अमेठीतील फुरसातगंज येथून दुपारी 2 वाजता पुन्हा सुरू होईल. राहुल गांधी मंगळवारी सकाळी 11 वाजता सुलतानपूरच्या स्थानिक न्यायालयात हजर राहू शकतात.
2018 मधील प्रकरण नेमकं काय?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुलतानपूर खासदार/आमदार (MP/MLA) न्यायालयानं 20 फेब्रुवारी 2018 रोजी एका प्रकरणात समन्स बजावलं आहे. राहुल यांनी 2018 मध्ये बंगळुरूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. याच प्रकरणी राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. त्यासाठीच आज काही तासांसाठी भारत जोडो न्याय यात्रा थांबवली जाणार आहे.
राहुल गांधींनी बंगळुरूमध्ये बोलताना अमित शहांना खूनी म्हटलेलं : विजय मिश्रा
याबाबत बोलताना तक्रारदार विजय मिश्रा यांनी सांगितलं की, "ही घटना घडली तेव्हा मी भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष होतो. राहुल गांधी यांनी बंगळुरूमध्ये बोलताना अमित शहा यांचा उल्लेख खुनी असा केला होता. जेव्हा मी त्यांच्या आरोपांबद्दल ऐकलं तेव्हा मला खूप वेदना झाल्या कारण मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी माझ्या वकिलांमार्फत तक्रार दाखल केली असून गेल्या पाच वर्षांपासून हे प्रकरण सुरू आहे."
दोषी आढळल्यास राहुल गांधींना शिक्षा होणार?
तक्रारदार विजय मिश्रा यांचे वकील संतोष कुमार पांडे यांनी सांगितलं की, राहुल गांधी यांच्याविरोधात पुरेसे पुरावे आढळल्यास त्यांना जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. राहुल गांधी यांनी 2018 मध्ये बंगळुरू येथे पत्रकार परिषद घेत गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं होतं. 4 ऑगस्ट 2018 रोजी सुलतानपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात राहुलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर न्यायाधीश योगेश कुमार यादव यांनी राहुल गांधींना समन्स बजावलं होतं.