नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतीवरुन मोदी सरकार पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या आणि विरोधकांच्या निशाण्यावर आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांचाच जुन्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत निशाणा साधला.


''गरीब आणि मध्यमवर्गीयांना इंधनाच्या वाढलेल्या किंमतीची झळ बसत आहे. मात्र या व्हिडीओमध्ये आपले पंतप्रधान ज्या गोष्टी सांगत आहेत, त्या नक्कीच एखाद्या दुसऱ्या देशाबाबत असतील,'' असं ट्वीट राहुल गांधींनी केलं.

चार वर्षात पेट्रोलच्या किंमती कशा वाढल्या?

मोदी 2014 साली सत्तेत आले तेव्हा पेट्रोलची किंमत 71.51 रुपये (दिल्लीतील दर) प्रति लिटर होती. त्यानंतर ती घटून 2015 साली 58.91 रुपयांवरही आली. मात्र यानंतर पेट्रोलचे दर आतापर्यंत सतत वाढतच आहेत. 2016 साली पेट्रोल 59.35 रुपये प्रति लिटर होतं आणि 2017 साली 70.60 रुपये प्रति लिटर झालं. हेच दर 2018 मध्ये 82 रुपयांच्या वर गेले आहेत.