जयपूर : पाकिस्तान नेहमी भारताला अणुबॉम्बची धमकी देतो. परंतु भारत आता त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. आमच्याकडे असणारा अणुबॉम्ब आम्ही काही दिवाळीसाठी ठेवलेला नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. राजस्थानमधील बाडमेरमध्ये भाजपने एका प्रचारसभेचे आयोजन केले होते. मोदी एका प्रचारसभेत बोलत होते.

मोदी यावेळी म्हणाले की, भारताने पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरणे आता सोडून दिले आहे. नाहीतर पूर्वी दररोज आमच्याकडे न्युक्लिअर बटन आहे, या गोष्टीचा पाकिस्तानकडून पुनरुच्चार होत होता. माध्यमं त्यावेळी हेडलाईन लिहायची की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. तर मग आमच्याकडे असलेला अणुबॉम्ब आम्ही दिवाळीसाठी ठेवला आहे का? असा सवालही मोदींनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान गुजरातच्या पाटणमध्ये झालेल्या सभेत मोदींनी विंग कमांडर अभिनंदनला पाकिस्तानने सोडलं नसतं तर ती काळरात्र ठरली असती, असे विधानही केले आहे.