नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाची नवी कार्यकारिणी (CWC) जाहीर केली आहे. ज्यामध्ये अनेक अनुभवी आणि युवा नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर दिग्गज नेत्यांना सुट्टी दिली आहे. CWC मध्ये 23 सदस्य, 18 स्थायी आमंत्रित सदस्य आणि 10 आमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.

राहुल गांधींनी 22 जुलै रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे दिग्विजय सिंह, जनार्दन द्विवेदी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा या कार्यकारिणीत समावेश करण्यात आलेला नाही. तर मनमोहन सिंह, सोनिया गांधी, गुलाम नबी आझाद यांना कार्यकारिणीत कायम ठेवण्यात आलं आहे.

सर्व स्वतंत्र प्रभारी आणि काँग्रेसच्या मुख्य संघटनांचे प्रमुखही या कार्यकारिणीचे सदस्य असतील. काँग्रेस कार्यकारिणी निर्णय घेणारी सर्वात मोठी समिती आहे. याच वर्षी मार्चमध्ये काँग्रेसच्या महाअधिवेशनात एकमताने प्रस्ताव मंजूर करुन कार्यकारिणीच्या निवडीची जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवण्यात आली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली.

स्थायी आमंत्रित सदस्यांमध्ये राज्यातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, खासदार राजीव सातव आणि रजनी पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

कार्यकारिणीत कुणाकुणाचा समावेश?

23 सदस्यीय कार्यकारिणीत राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, मोतीलाल वोहरा, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, एके अँटोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, ओमान चांडी, तरण गोगोई, सिद्धरमैया, आनंद शर्मा, हरीश रावत, कुमारी शैलजा, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, केसी वेणुगोपाल, दीपक बाबरिया, तमराध्वाज साहू, रघुबीर मीणा, गाईखमगम आणि अशोक गहलोत यांचा समावेश करण्यात आला आहे.

याशिवाय स्थायी आमंत्रित सदस्यांमध्ये शीला दीक्षित. पी. चिदंबरम, ज्योतिरादित्य सिंधिया, बाळासाहेब थोरात, तारिक हमीद कारा, पीसी चाको, जितेंद्र सिंह, आरपीएन सिंह, पीएल पुनिया, रणदीप सुरजेवाला, आशा कुमारी, रजनी पाटील, रामचंद्र खुंतिया, अनुग्रह नारायण सिंह, राजीव सातव, शक्ती सिंह गोहिल, गौरव गोगोई आणि डॉ. ए चेलाकुमार यांच्या नावाचा समावेश आहे.

विशेष आमंत्रित सदस्यांमध्ये केएच मनुयप्पा, अरुण यादव, दीपेंद्र हुड्डा, जीतीन प्रसाद, कुलदीप विश्नोई, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष, इंडियन यूथ काँग्रेसचे अध्यक्ष, नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचे अध्यक्ष, ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि काँग्रेस सेवा दल प्रमुखांचा यामध्ये समावेश आहे.