नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी रघुराम राजन यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत आहे.


येत्या वर्षात जानेवारी महिन्यात दिल्लीतील राज्यसभेच्या 3 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी आम आदमी पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहे.

यामध्ये रघुराम राजन यांचं नाव आघाडीवर आहे. सूत्रांच्या मते, ‘आप’ने त्याबाबत राजन यांच्याशी संपर्कही साधला आहे.

सध्या विविध नावांवर चर्चा सुरु आहे, कोणतंही नाव निश्चित करण्यात आलेलं नाही.

सध्या ‘आप’मध्येच राज्यसभेच्या जागेवरुन राडा सुरु आहे. काही वरिष्ठ नेते राज्यसभेत जाण्यासाठी उत्सुक आहेत. आपचे संस्थापक सदस्य कुमार विश्वास यांनीही राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दरम्यान, कोणत्याही वरिष्ठ नेत्याला राज्यसभेवर पाठवण्यात येणार  नाही, असं आपच्या एका नेत्याने सांगितलं.

खरंतर या वर्षभरात ‘आप’मध्ये अंतर्गत वाद उफाळून आला होता. कुमार विश्वास यांनी अनेकवेळा पक्षविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे अनेक ‘आप’ नेते कुमार विश्वास यांच्यावर नाराज आहेत.

दुसरीकडे ‘आप’मधून निलंबित केलेले आमदार कपिल मिश्रा यांनीही, कुमार विश्वास यांना राज्यसभेवर जाण्यापासून ‘आप’मधील काही लोक रोखत आहेत, आरोप केला होता.