नवी दिल्ली : राफेलप्रकरणी बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली, त्यावेळी राफेल कराराची कागदपत्रे चोरी झाल्याचे महाधिवक्ते केके वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितले होते. परंतु राफेल कराराची कागदपत्रे चोरी झालीच नाहीत, तर त्याची फोटोकॉपी काढण्यात आली असल्याचे भाष्य करुन वेणुगोपाल यांनी यु-टर्न घेतला आहे. वेणुगोपाल म्हणाले की, 'माझ्या बोलण्याचा माध्यमांनी चुकीचा अर्थ काढला आहे.'


वेणुगोपाल म्हणाले की, "राफेल करारासंदर्भात सुप्रीम कोर्टात प्रशांत भूषण आणि यशवंत सिन्हा यांनी कागदपत्रांच्या प्रती सादर केल्या. ही कागदपत्रे गोपनीय आहेत, परंतु या कागदपत्रांच्या फोटोकॉपीज काढल्यामुळे ती सार्वजनिक झाली."

दरम्यान वेणुगोपाल यांनी राफेल करारासंदर्भातली कागदपत्रे चोरीला गेल्याचे वक्तव्य केल्यानंतर विरोधकांसह देशभरातून सर्वांनी सरकारवर टीका करणे सुरु केले आहे. त्यानंतर आता महाधिवक्ते केके वेणुगोपाल यांनी कागदपत्रे हरवली नसल्याचे म्हटले आहे.