काश्मीरी तरुणांवरील हल्ले खेदजनक, नरेंद्र मोदींनी हल्लेखोरांना झापले
एबीपी माझा वेब टीम | 08 Mar 2019 11:31 PM (IST)
काश्मीरी तरुणांना झालेल्या मारहाणीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. आज उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील रॅलीदरम्यान मोदींनी नागरिकांना देशात एकतेचे वातावरण टिकवून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
लखनौ : काश्मीरी तरुणांना झालेल्या मारहाणीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. आज उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील रॅलीदरम्यान मोदींनी नागरिकांना देशात एकतेचे वातावरण टिकवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. मोदी म्हणाले की, "लखनौमध्ये काही समाजकंटकांनी काश्मीरी तरुणांसोबत केलेले कृत्य निंदणीय आहे. उत्तर प्रदेश सरकारने त्याविरोधात कडक कारवाई केली आहे. त्यामुळे मला योगी सरकारचा अभिमान वाटतो. देशात असे प्रकार घडायला नको. यामुळे देशाच्या एकतेचे नुकसान होते" मोदींनी या रॅलीदरम्यान पुन्हा एकदा विरोधकांना लक्ष्य केले. मोदी म्हणाले की, "विरोधक आमच्याकडे एअर स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. हे लोक भारतीय लष्कराच्या शौर्यावर अविश्वास दाखवत आहेत. विरोधक हल्ली जे काही बोलतात ते ऐकून आपले शत्रू खूश होतात." मोदी म्हणाले की, "पुलवामा हल्ल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी करण्याचे खूप प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच आज संपूर्ण जग पाकिस्तानवर दबाव टाकत आहे. परंतु आपल्या देशातील काही लोक मात्र पाकिस्तानला सहकार्य करण्याचे प्रयत्न करत आहेत." दरम्यान महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली होती. या मारहाणीचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले होते.