नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजवलं. यावेळी कथित राफेल विमान खरेदी घोटाळ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला.


56 इंचांच्या छातीसमोर संसदेत राफेल विमान घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित होतो, भ्रष्टाचारावर प्रश्न विचारले जातात, तेव्हा दीड तासांच्या भाषणात एका मिनिटाचंही उत्तर मिळत नसल्याची टीका राहुल गांधींनी केली.

बिझनेसमन मित्र अनिल अंबानी यांच्या कंपनीला कंत्राट देऊन मोदींनी मदत केल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला. अनिल अंबानी यांनी हा आरोप आधीच फेटाळला होता. या खरेदीत सरकारची काहीच भूमिका नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

विमानाचं मॅन्युफॅक्चरिंग परदेशात होणार असल्यामुळे अनेक तरुण भारतीय अभियंत्यांचा रोजगार हिरावला गेला, असा आरोपही राहुल गांधींनी केला. 2015 मध्ये भारताने फ्रान्सकडून 36 राफेल विमानं खरेदी करण्यासाठी करार केला होता.

भारताची लोकसंख्या जवळपास चीनइतकीच असूनही आपल्या देशात कमी रोजगार निर्मिती होते, हे शरमेची बाब आहे. भारतात दररोज फक्त 450 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होते, त्याउलट चीनमध्ये रोज 50 हजार तरुणांना रोजगार मिळतो, असा दावाही राहुल गांधींनी केला.

जयपूरमध्ये काँग्रेस प्रतिनिधींच्या संमेलनात ते बोलत होते. राहुल गांधी यांनी जयपूरमध्ये रोड शो केला. त्यानंतर गोविंद देव मंदिरात पूजाही केली.