नवी दिल्ली : राफेल विमान खरेदीप्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. राफेलच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फ्रान्सची विमान बनवणारी कंपनी दसॉल्ट एव्हिएशनवरही गंभीर आरोप केले होते. दरम्यान दसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी इरिक ट्रॅपिअर यांनी काँग्रेसचे आरोप चुकीचे असल्याचं म्हटलं आहे.
एएनआयशी बोलताना दसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी इरिक ट्रॅपिअर म्हणाले की, "राफेल डीलमध्ये दसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स यांच्यात झालेल्या कराराबद्दल मी काहीही खोटं बोललो नाही. आम्ही स्वत: अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीची निवड केली आहे. अंबानींव्यतिरिक्त आणखी 30 जणांबरोबर करार करण्यात आले आहेत."
राहुल गांधी यांच्या आरोपांवर बोलताना ट्रॅपिअर म्हणाले की, "मी खोटं बोलत नाही. मी याआधी जे काही सांगितलं आणि जी वक्तव्य केली, ती सत्य होती. मी ज्या पदावर आहे, त्याला तुम्ही खोटं बोलू शकत नाही."
राफेल विमानांची किंमत वाढवली असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र विमानांची किंमत वाढवली नसल्याचं ट्रॅपिअर यांनी स्पष्ट केलं. "विमानांची संख्या 18 असताना जेवढी किंमत ठरवण्यात आली होती, तीच किंमत विमानांची संख्या 36 झाल्यानंतर देण्यात आली आहे. दोन सरकारांमधील करार असल्याने या किमतीत वाढ करण्यात आली नाही, असंही ट्रॅपिअर यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं.
राफेल डील काय आहे?
फ्रान्स भारताला 2019 अखेरपर्यंत 36 राफेल लढाऊ विमान देणार आहे. सप्टेंबर 2016 साली भारत आणि फ्रान्स यांच्यातील या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.
काँग्रेसचा आक्षेप नेमका कशावर?
काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या 36 विमानांच्या किंमतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मोदी सरकारने देशातील प्रसिद्ध कंपनी एचएएलला बाजूला सारलं आणि रिलायन्स ग्रुपला फायदा करुन दिला, असा आरोप काँग्रेसचा आहे. तर यूपीएच्या डीलमध्ये फ्रान्सची डासू एव्हिएशन आणि एचएएल यांच्यात करार झाला होता.