भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघाच्या शाखांवरून काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आले आहेत. काँग्रेसने आपल्या वचननाम्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघ शाखेत जाण्यावर आणि सरकारी कार्यालयांच्या परिसरात संघाच्या शाखांवर निर्बंध लावण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र काँग्रेसच्या आश्वासनानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह संतापले आहेत.


शिवराज सिंह यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसला थेट आव्हान दिलं. संघ शाखांमध्ये सरकारी कर्मचारी सहभागी होतील आणि त्यांना कोण रोखू शकत नाही, असं शिवराज सिंह म्हणाले. नेहरुंची काँग्रेस संघावर बंदी आणू शकली नाही, सध्याची काँग्रेसला तर ते कधीही शक्य होणार नाही. संघ देशभक्तांची शाखा आहे, असंही शिवराज सिंह म्हणाले.


संघाच्या शाखामध्ये शिस्त आणि राष्ट्र निर्माण शिकवलं जातं. त्यामुळे संघाच्या शाखा आता सरकारी कार्यालयांमध्येही सुरू करणार असून सरकारी कर्मचारी त्यामध्ये सहभागी होतील, अशी घोषणाच शिवराज सिंह यांनी केली. संघाच्या शाखांवर कुणीही बंदी आणू शकत नाही, काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी संघाच्या शाखांवर बंदी आणून दाखवावी, असं आव्हान शिवराज सिंह यांनी काँग्रेसला दिलं.


मध्य प्रदेशमध्ये लोकांनी सत्ता दिली तर आम्ही सरकारी इमारतींच्या परिसरातील संघांच्या शाखा बंद करू, असं काँग्रेसनं आपल्या वचननाम्यात म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं की, "ही जुनी विचारधारा आहे. नियमानुसार कोणताही सरकारी कर्मचारी राजकीय संघटनेशी जोडू शकत नाही. धर्माला राजकारणात आणू नये आणि राजकारण धर्मात आणू नये."