नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानाच्या राजकीय वादानंतर फ्रान्सचे तीन राफेल लढाऊ विमाने भारतीय वायूसेनेच्या ग्वाल्हेरमधील एअरबेसवर दाखल झाली आहेत. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या ‘पिच ब्लॅक’ युद्ध सरावातील ही विमानं आहेत, ज्यात भारतीय वायूसेनेनेही सहभाग घेतला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या तीन लढाऊ विमानांसह एक अॅटलास-400 एम मिलिट्री ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, एक सी-135 रिफ्यूलर विमान आणि एक एअरबस कार्गो विमानाने ऑस्ट्रेलियाहून ग्वाल्हेरच्या हवाई दलाच्या तळावर दाखल झाली.
यावेळी दोन्ही देशाची हवाई सेना एकत्र उड्डाण घेणार असल्याचीही शक्यता आहे. ग्वाल्हेर एअरबेसवर भारताच्या मिराज-2000 एच लढाऊ विमानांची स्क्वाड्रन तैनात आहे.
फोटो : रॉयल ऑस्ट्रेलिया वायूसेना
ऑस्ट्रेलियात झालेल्या पिच ब्लॅक युद्ध सरावात भारतीय वायूसेनेच्या वैमानिकांनी राफेल लढाऊ विमानातून उड्डाण घेतलं होतं, ज्याचे फोटो ऑस्ट्रेलियाच्या वायूसेनेने जारी केले होते. फ्रान्सचा हा ताफा पिच ब्लॅक युद्ध सरावासोबतच आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील पिगेस नावाच्या युद्ध सरावात सहभाग घेणार आहे.
फोटो : रॉयल ऑस्ट्रेलिया वायूसेना
मिराज लढाऊ विमानंही भारताने 80 च्या दशकात फ्रान्सकडून खरेदी केली होती. मिराज विमानांची निर्मिती राफेल विमान बनवणारी कंपनी दसॉल्टने केली होती.
फ्रान्सकडून भारताने ज्या 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली आहे, त्याची पहिली खेप सप्टेंबर 2019 पर्यंत येणार आहे. भारतीय वायूसेनेच्या अंबाला येथील एअरबेसवर राफेलची पहिली स्क्वाड्रन तैनात केली जाईल. या स्क्वाड्रनला गोल्डन एरो नाव दिलं आहे. दुसरी स्क्वाड्रन सिक्कीमजवळील उत्तर बंगालच्या हाशीमारामध्ये तैनात असेल.
ग्वाल्हेर एअरबेसवर राफेल लढाऊ विमान येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2015 मध्ये बंगळुरुत झालेल्या एयरो-शोमध्येही राफेल लढाऊ विमानांनी सहभाग घेतला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता.
फ्रान्सचे तीन राफेल लढाऊ विमान भारतात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Sep 2018 08:59 AM (IST)
ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या ‘पिच ब्लॅक’ युद्ध सरावातील ही विमानं आहेत, ज्यात भारतीय वायूसेनेनेही सहभाग घेतला होता. फ्रान्सकडून भारताने ज्या 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली आहे, त्याची पहिली खेप सप्टेंबर 2019 पर्यंत येणार आहे.
फोटो : रॉयल ऑस्ट्रेलिया वायूसेना
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -