पणजी:  काश्मीरसह अनेक मुद्यांच्या दडपणामुळं संरक्षणमंत्रीपद सोडलं, असं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलंय. तसंच दिल्ली हे आपलं कार्यक्षेत्र नसल्याची जाणीव झाल्यानेच गोव्यात परतण्याचा निर्णय घेतला असंही पर्रिकर यांना सांगितलं.


पणजीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्तीनिमित्त एका कार्यक्रमात मनोहर पर्रीकर बोलत होते.

काश्मीरचा मुद्दा सोडवणं हे कठीण काम आहे. त्यावर चर्चा करण्यापेक्षा ठोस कारवाईची आवश्यकता असल्याचंही मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं.

पर्रिकर म्हणाले, "केंद्रात काश्मीर आणि अन्य मोठ्या समस्या आहेत. दिल्लीत एकच समस्या नसते. खूपच दबाव असतो".

पर्रिकर यांनी काश्मीर मुद्द्याचा दबाव असल्याचं सांगितलं असलं, तरी नेमका काय दबाव होता, हे मात्र सांगितलेलं नाही.

दरम्यान, पर्रिकर यांनी गेल्या महिन्यातच गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेतली.