रणथंबोरची राणी 'मछली' वाघिणीचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 18 Aug 2016 06:04 AM (IST)
जयपूर : राजस्थानमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध वाघीण मछलीचा मृत्यू झाला आहे. तिला T-16 म्हणूनही ओळखलं जात होतं. 19 वर्षांची ही वाघीण गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. तसंच गेल्या पाच दिवसांपासून तिने अन्नत्यागही केला होता. पार्कमधील अमा घाट परिसरात सध्या तिचं वास्तव्य होतं. मछली मोस्ट फोटोग्राफ्र्ड म्हणजेच सर्वाधिक फोटो काढली गेलेली वाघीण म्हणूनही विशेष चर्चेत होती. वाघांचं सरासरी वय 15 वर्षांपर्यंतच असतं पण मछलीने त्यावर मात करत 19 वर्षांचा पल्ला गाठला होता. मछलीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीमही या पार्कमध्ये ठेवण्यात आली होती. आज सकाळी 9 वाजून 48 मिनिटांनी तिला मृत घोषित करण्यात आलं. मछलीमुळे रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाला गेल्या दहा वर्षांत दरवर्षी 50 ते 60 कोटी रूपयांचं उत्पन्नही मिळत होतं. यासाठी तिला 2009 साली सन्मानितही करण्यात आलं होतं.