Russia Ukraine War : गेल्या अडीच महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. मोठे नुकसान होऊनही दोन्ही देश अजूनही माघार घेण्याच्या स्थितीत नाहीत. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन अण्वस्त्रांचा वापर करू शकतात असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी केला आहे. हा दावा करताना त्यांनी म्हटले आहे की, रशियाचे अस्तित्व धोक्यात येईल तेव्हाच अण्वस्त्रांचा वापर करू शकतात असा दावा  अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी केला आहे. 


पुतिन हे युद्ध डॉनबासच्या पुढे ट्रान्सनिस्ट्रियापर्यंत नेण्यासाठी दीर्घ युद्धाची योजना आखत आहेत, अशी माहिती एएफपी या वृत्तसंस्थेन दिली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखांच्या मते, युद्धाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी पुतिन रशियामध्ये मार्शल लॉ लागू करू शकतात.


दरम्यान, युक्रेनमधील वाहतूक मार्ग आणि शस्त्रास्त्र वाहतूक विस्कळीत करण्यासाठी रशियन सैन्याने ओडेसाच्या महत्त्वाच्या किनारपट्टीवर हल्ला केला आहे. युक्रेनियन सैन्याने मंगळवारी सांगितले की रशियन सैन्याने एक दिवसापूर्वी ओडेसा येथील ब्लॅक सी बंदरावर सात हवाई क्षेपणास्त्रे डागली होती. यामध्ये शॉपिंग सेंटर आणि एक गोदाम लक्ष्य करण्यात आले होते. युक्रेनच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने केलेल्या या हल्ल्यात एक जण ठार झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.


युक्रेनचा दावा आहे की या हल्ल्यासाठी रशियाने काही सोव्हिएत काळातील शस्त्रे वापरली होती. युक्रेन, ब्रिटन आणि अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, रशिया आपल्या अचूक मारा करणाऱ्या शस्त्रास्त्रांचा साठा वाढवत आहे. तर मारियुपोल येथील स्टील प्लांटमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या शेवटच्या तुकडीची सुटका केल्यानंतर, अधिकाऱ्यांनी सांगितले की अजून ही 100 लोक येथील बोगद्यात अडकले आहेत.


रशिया आणि युक्रेनमध्ये 26 फेब्रुवारीपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून युद्ध थांबवण्यासाठी शिष्टमंडळांच्या काही बैठकाही झाल्या आहेत. परंतु, या बैठका निष्फळ ठरल्या आहेत. अडीच महिन्यांपासून सुरू असलेला दोन्ही देशांतील हा संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. या युद्धाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील परिणाम होत आहे. अनेक देशातील महागाई या युद्धामुळे वाढत आहे. तर जगभरातील अनेक देशांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परंतु, तरी देखील रशिया माघार घ्यायला तयार नाही.