Punjab Gun Culture: पंजाबमधील 'गन कल्चर' विरोधात भगवंत मान (Bhagwant Mann) सरकारनं कडक पावलं उचलली आहेत. गाण्यांमध्ये बंदूक वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पंजाबच्या भगवंत मान सरकारने 'बंदूक कल्चर' बाबत आक्रमक पावलं उचलली आहेत. शस्त्रास्त्रांबाबत पंजाबमधील आप सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. पंजाब सरकारने (Punjab News) यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यात दररोज गोळीबार होत असल्याच्या बातम्या येत असताना सरकारने याबाबत कडक पावलं उचलली आहेत. जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, सार्वजनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करण्यास सक्त मनाई असेल.


सरकारनं म्हटलं आहे की, राज्यात शस्त्र परवाना इतक्या सहजासहजी मिळणार नाही. याबाबत अनेक नियमही करण्यात आले आहेत. आता येत्या काही दिवसांत विविध भागात तपासणी केली जाणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पंजाबी गाण्यांमध्ये शस्त्रांचा गौरव करणे बंद करण्यात आले आहे. यापुढे ड्रग्ज आणि शस्त्रे गाण्याचा भाग असणार नाहीत, असं देखील सरकारनं आदेशांमध्ये म्हटलं आहे. 






पंजाब सरकारची नवीन मार्गदर्शक तत्त्वे  


आतापर्यंत जारी केलेल्या सर्व शस्त्र परवान्यांचे पुढील 3 महिन्यांत संपूर्णपणे पुनरावलोकन केले जाईल. जिल्हाधिकारी वैयक्तिकरित्या समाधानी नसल्यास कोणताही नवीन शस्त्र परवाना मंजूर केला जाणार नाही.
शस्त्रांचे सार्वजनिक प्रदर्शन (सोशल मीडियावरील प्रदर्शनासह) सक्त मनाई आहे.
येत्या काही दिवसांत विविध भागात तपासणी केली जाणार आहे.
शस्त्रे किंवा हिंसेचा गौरव करणारी गाणी कठोरपणे प्रतिबंधित आहेत.
एफआयआर नोंदवला जाईल आणि कोणत्याही समाजाविरुद्ध असभ्य भाषा बोलणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
मानवी जीवन किंवा इतरांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी शस्त्रांचा घाई किंवा बेपर्वाईने वापर करणे किंवा उत्सवासाठी गोळीबार करणे हा दंडनीय गुन्हा असेल कारण उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध एफआयआर नोंदविला जाईल.