House Lifting : आपलं स्वत:चं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण प्रेमाने मोठ्या आणि खर्च करुन बनवलेलं हेच घर (House) तुटण्याची वेळ आली तर कोणीही व्यक्ती हरतऱ्हेचे प्रयत्न करतो. पंजाबच्या (Punjab) संगरुर जिल्ह्यातील रहिवासी असलेले सुखविंद सिंह सुखी गिर हे सध्या चर्चेत आहेत. आपल्या स्वप्नाचं घर वाचवण्यासाठी त्यांनी जी पद्धत अवलंबली त्याचीच सगळीकडे चर्चा आहे. त्यांचं घर दिल्ली-अमृतसर-कटरा एक्स्प्रेसवेच्या (Delhi–Amritsar–Katra Expressway) मार्गात येत होतं. अशा परिस्थितीत सुमारे एक कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करुन बनवलेलं हे घर तुटू नये म्हणून त्यांनी जुगाड केला. त्यांनी चक्क जॅक आणि रोलिंग लावून आपलं घर सध्याच्या ठिकाणाहून 500 फुटांपैकी 250 अंतरावर हलवलं आहे. यामुळे त्यांचं घरही वाचलं आणि सरकारी योजनेमध्ये कोणती अडचणही आली नाही.
सुखविंदर सिंह सुखी गिर हे शेतकरी आहेत. संगरुरच्या रोशलवाला गावाजवळून भारत माला प्रकल्पाअंतर्गत दिल्ली-कटारा-जम्मू एक्स्प्रेसवेचं बांधकाम सुरु आहे. यासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित केली आहे. सुखविंदर सिंह सुखी गिर यांचीही अडीच एकर जमीन एक्स्प्रेसवेच्या कक्षेत आली आहे. पण त्यांनी आपल्या शेतातच घर बांधलं आहे. सोबतच त्यांनी तिथे गहू आणि भाताचं बियाणं तयार करण्याचा छोटा कारखाना देखील उभारला आहे. अशातच जमीन संपादनाची सुरुवात झाली. त्यांनी तिथून कारखाना तर हटवला पण घर हटवण्यासाठी ते तयार नव्हते.
...म्हणून घर स्थलांतरित करण्याचं ठरवलं : सुखविंदर सिंह
सुखविंदर सिंह सुखी गिर सांगतात की, "मी दीड कोटी रुपये खर्च करुन स्वप्नातलं घर बनवलं दोन वर्षात बनवलं. 2019 मध्ये हे दोन मजली तीन ते साडेतीन हजार चौरस फुटांचं घर बनून तयार झालं." सुखविंदर सिंह आपल्या भावासह या घरात राहतात. पण सरकारी योजनेत हे घर आलं. सरकारकडून त्यांना घरासाठी नुकसान भरपाईची ऑफर देण्यात आली होती. परंतु त्यांनी ती स्वीकारली नाही आणि घर स्थलांतरित करण्याचा विचार केला. सध्याचं घर तोडून पुन्हा घर बनवायचं झालं तर फार खर्च येईल आणि वेळही वाया जाईल. त्यामुळे लिफ्टिंग टेक्नॉलॉजीने घर उचलून शिफ्ट करायचा विचार त्यांच्या मनात आला. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तींशी संपर्क करुन काम सुरु केलं.
कामगारांनी अथक मेहनत आणि देसी जुगाड करुन कोणतंही नुकसान न करता दोन महिन्यात घर 250 फुटांपेक्षा जास्त अंतरावर हलवलं. हे घर अजून 250 फूट हलवायचं आहे. मग ते 60 फुटांनी दुसरीकडे वळवलं जाईल. या कामासाठी 40 लाखांच्या जवळपास खर्च येईल.
घर एका जागेवरुन दुसऱ्या जागी हलवणं आव्हानात्मक काम : मोहम्मद शाहिद
तर घर एका जागेवरुन दुसऱ्या जागी हलवणं हे आव्हानात्मक काम होतं, असं हे घर शिफ्ट करण्याचं काम करणारे मोहम्मद शाहिद यांनी सांगितलं. मोहम्मद शाहिद हे बिल्डिंग लिफ्ट करण्याचं काम करतात. या प्रक्रियेत इमारत अनेक फूट उंच उचलली जाते. पण घर शिफ्ट करण्याचं आव्हान मोठं होतं कारण यावेळी घराला एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर न्यायचं होतं, ते देखील 500 फुटांपेक्षा जास्त अंतरावर. आता दरदिवशी घर 10 फूट पुढे सरकवलं जातं. हे काम अत्यंत काळजीपूर्वक करावं लागलं, असं मोहम्मद शाहिद म्हणाले.
मोहम्मद शाहिद यांनी सांगितलं की हे संपूर्ण काम गाडी उचलणारा जो जॅक असतो त्याच्या मदतीने केलं जातं. सर्व कामगारांना एक कोड दिला जातो आणि ते एकत्रच पुढे केला जातो. पंजाबमधला हा आमचा पहिलाच प्रकल्प आहे.