चंदीगड : नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरु होण्याची शक्यता आहे. पटियालामध्ये सिद्धूंच्या घरी काल रात्री उशीरापर्यंत बैठक सुरु होती. त्यामध्ये अनेक आमदार आणि मंत्री उपस्थित होते. ही सर्व परिस्थिती विचारात घेता मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी आज सकाळी साडे दहा वाजता एक तातडीची बैठक बोलावली आहे. 


मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्या नव्या कॅबिनेटची पहिली बैठक 1 ऑक्टोबरला होणार होती. पण पंजाबमधील राजकीय हालचाली लक्षात घेता त्यांनी आज एक तातडीची बैठक बोलावली आहे. 


काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा नवज्योतसिंग सिद्धू यांनी मंगळवारी राजीनामा दिला होता. अद्याप काँग्रेस हायकमांडने तो स्वीकारला नसून पक्ष वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचं लक्षात येतं. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा निवटवर्तीय रजिया सुल्ताना यांनीही राजीनामा दिला आहे. आज आणखी दोन मंत्री राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत. तसेच इतरही काही महत्वाचे नेते राजीनामा द्यायच्या तयारीत असल्याची माहिती आहे. 


माणसाच्या चारित्र्य पतनाला तडजोडीतून सुरुवात होते, मी कधीही पंजाबच्या कल्याणाच्या भवितव्याशी तडजोड करु शकत नाही असं सांगत काल नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मंत्र्यांची नावे ठरवताना त्यांना हायकमांडने सहभागी करुन घेतलं नाही, खातेवाटपाच्या वेळीही त्यांना विचारलं गेलं नाही आणि मुख्य पदांवर निवड करताना (डीजीपी आणि मुख्य सचिवांसारख्या पदांवर) सीएम सिद्धू यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली नाही. अशा स्थितीत पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्यांनी आपली नाराजी हायकमांडसमोर व्यक्त केली आहे. पंजाबमध्ये मंत्र्यांची नावे ठरवली गेली, तेव्हा राहुल गांधी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्याशी चर्चा करुन ठरवली होती.


महत्वाच्या बातम्या :