Puneeth Rajkumar Fans died: 46 वर्षीय  कन्नड सुपरस्टार अभिनेता पुनित राजकुमार यांच्या निधनाचा (Puneeth Rajkumar death) चाहत्यांना धक्का बसला आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे पुनित यांचं शुक्रवारी निधन झालं.  चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्याला अप्पू म्हणत होते. पुनित यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच अनेकांनी टाहो फोडला. पुनित राजकमुमार यांचं अकाली जाणं काही चाहत्यांना जिव्हारी लागलं. पुनित यांच्या मृत्यूची माहिती मिळताच सर्व चाहते रुग्णालयाबाहेर जमा झाले होते. काही चाहते टाहो फोडून रडत होते. सोशल मीडियावर काही फोटोही व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये त्यांच्या मृत्यूचा धक्का चाहत्यांना सहन होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आपला आवडता कलाकार गेल्यामुळे एका चाहत्यानं आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. तर इतर दोन चाहत्यांचं कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं.


पुनित राजकुमार (Puneeth Rajkumar) यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसला आहे. कर्नाटकमधील चामराजनगर जिल्ह्यातील मारो गावातील 30 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या चाहत्याचं नाव मुनियप्पा असल्याचं समजतेय. त्याच्या मागे पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. स्थानिकांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुनियप्पा सुपरस्टार पुनित यांचा डायहार्ट फॅन होता. पुनित यांचा प्रत्येक चित्रपट तो पाहत होता. पुनित यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच मुनियप्पा ढसाढसा रडू लागला. अशातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारावेळीच त्यांचा मृत्यू झाला. बेळगावमधील शिंदोली गावातील परशुराम देमन्ना यांचंही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पुनित यांच्या निधनाचे वृत्त ऐकून ते निराश होते. अशातच रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला अन् मृत्यू झाला. 


बेळगाव जिल्ह्यातील अथानी गावांतील एका चाहत्यानं आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. राहुल गादिवादारा असं चाहत्याचं नाव असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गादिवादारा यांनी आधी पुनित यांच्या प्रतिमेची पूजा केली. फूल आणि हार घालून फोटो सजवला. त्यानंतर आपल्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं. 
 
दरम्यान, शुक्रवारी अभिनेता पुनीत राजकुमार यांना सकाळी 11.30 वाजता छातीत दुखू लागल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टारांनी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. पुनित राजकुमार यांना चाहते प्रेमाने अप्पु म्हणत. पुनित दिग्गज अभिनेते राजकुमार आणि Parvathamma यांचा मुलगा होय. पुनित राजकुमार यांनी 29 पेक्षा जास्त कन्नड चित्रपटात अभिनय केला आहे.  बाल कलाकार म्हणून पुनित यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता. ‘अभी’, अप्पू, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरासु’, ‘राम’, ‘हुडुगारु’ आणि‘अंजनी पुत्र’ यासारख्या चित्रपटात काम केलं आहे. पुनित राजकुमार यांचा अखेरचा चित्रपट युवारत्न हा होय. गतवर्षी हा चित्रपट रिलीज झाला होता.