पहिला बदला पूर्ण, पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडसह जैशच्या दोन दशतवाद्यांचा खात्मा
एबीपी माझा वेब टीम | 18 Feb 2019 11:41 AM (IST)
पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे. सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणेने काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे.
पुलवामा : भारतीय जवानांनी जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याचा पहिला बदला घेतला आहे. भारतीय जवानांनी पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरानचा खात्मा केला आहे. तसंच जैशचा आणखी एका दहशतवादी गाजी राशीदलाही ठार केलं आहे. दहशतवाद्यांनी लपण्यासाठी एका घरात आश्रय घेतला होता, तेच घर जवानांनी उद्ध्वस्त केलं आहे. कामरान हा काश्मीर खोऱ्यातील जैश-ए-मोहम्मदचा सर्वात मोठा कमांडर होता. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे. सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणेने काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. पुलवामाच्या पिन्गलान परिसरात पहाटेपासून जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत 55 राष्ट्रीय रायफल्सच्या मेजरसह चार जवान शहीद झाले आहेत. तसंच एका नागरिकाचाही मृत्यू झाला होता. मेजर डीएस डॉन्डियाल, हेड कॉन्स्टेबल सेवराम, शिपाई गुलजार अहमद, शिपाई अजय कुमार आणि शिपाई हरि सिंह अशी शहीदांची नावं आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर कामरान आणि गाजी रशीद पळ काढण्यात यशस्वी ठरले होते, तर आदिर डार हा दहशतवादी आत्मघाती हल्ल्यात ठार झाला होता. कामरान हा जैश-ए-मोहम्मदचा जम्मू-काश्मीरमधील कमांडर आहे. पुलवामा, अवंतीपुरा आणि त्राग या भागात तो सक्रिय होता. त्याने पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलं आहे. 8 फेब्रुवारीला त्याने इंटरनेटवरुन संवाद साधला होता. तर गाजी रशीद हा जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा निकटवर्तींपैकी एक होता. त्या युद्धनीती आणि आयईडी बनवण्याचं प्रशिक्षण तालिबानकडून मिळालं होतं. त्यामुळे या कामासाठी त्याला जैशचा सर्वात भरवशाचं समजलं जातं. गाजी रशीद 9 डिसेंबरलाच सीमा पार करुन काश्मीरमध्ये घुसला होता. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याच्या शोधासाठी अभियान हाती होतं. दहशतवादी पिन्गलानमध्ये अतिरेकी लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. यानंतर चकमकीदरम्यान जवानांनी दहशतवादी लपलेलं घरच उडवलं.