लखनौ : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरच्या पुलवामातील अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या गाडीला विस्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक दिली. झालेल्या स्फोटात 40 भारतीय जवान शहीद झाले. यापैकी अनेक जवान सुट्टीवरून परतत होते. या शहीद जवानांमध्ये उत्तर प्रदेशमधल्या चंदोली येथील अवधेशकुमार यादव यांचाही समावेश आहे. अवधेश यादव 45 व्या बटालियनमध्ये तैनात होते. शहीद अवधेशकुमार यांची आई कॅन्सर पीडित आहे. त्यांच्या आईला आपला मुलगा शहीद झाला आहे, हे अद्याप माहीत नाही. अजूनही ती आई तिच्या मुलाच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे.


गुरुवारी सायंकाळी जवान शहीद झाल्याची बातमी देशभर पसरली. त्यानंतर अवधेशकुमार यांच्या गावातील गावकरी त्यांच्या घरी जमू लागले. परंतु अवधेश यांच्या कुटुंबियांनी ते शहीद झाल्याची बातमी त्यांच्या कॅन्सर पीडित आईपासून लपवून ठेवली असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.



गावकऱ्यांनी सांगितले की, "अवधेश यांच्या आईला कॅन्सर आहे. त्यामुळे त्यांचा मुलगा शहीद झाला आहे, ही गोष्ट त्यांना सांगण्याची घरातील कोणालाही हिंमत होत नाही." चंदोली जिल्ह्यातील मुगलसराय कोतवालीच्या बहादूरपूर गावात अवधेशकुमार राहतात. अवधेश यांच्या घरी ते शहीद झाल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही, परंतु माध्यमांनी शहीद जवानांची यादी प्रसिद्ध केल्यामुळे गावकऱ्यांसह अवधेश यांच्या कुटुंबियांना अवधेश शहीद झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे संपूर्ण गाव अवधेश यांच्या घरी जमा झाला आहे. 12 फेब्रुवारी रोजी अवधेश कुमार सुट्टी संपवून कर्तव्यावर रुजू झाले होते.