नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये भारतीय जवानांवर झालेला अतिरेकी हल्ला हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे संयुक्त षडयंत्र होतं, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार बी. के. हरीप्रसाद यांनी केला आहे.


हरीप्रसाद म्हणाले की, "पुलवामा हल्ल्याचा घटनाक्रम पाहिला, तर आपल्या लक्षात येईल की, नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्या संगनमताशिवाय हे सर्व शक्य नाही. त्यामुळे भाजपचे प्रवक्ते रवीशंकर प्रसाद यांनी मोदी-इम्रान या दोघांमध्ये नक्की काय कट शिजला हे जाहीर करावे,"

त्यानंतर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी बी. के. हरीप्रसाद यांना उत्तर दिले आहे. रवीशंकर प्रसाद म्हणाले की, "हरीप्रसाद यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करुन भारताची दहशतवादाशी तुलना केली आहे. हरीप्रसाद यांनी भारताची पाकिस्तानशी तुलना केली आहे. काँग्रेसने भारतीय जवानांचा अपमान केला आहे."

पाहा काय म्हणाले बी. के. हरीप्रसाद



रवीशंकर प्रसाद म्हणाले की, "इतके गंभीर आरोप केल्यानंतरही आम्ही काँग्रेसला किंवा हरीप्रसाद यांनी माफी मागावी अशी मागणी करणार नाही. भारताची जनताच त्यांना योग्य उत्तर देईल. एकीकडे देश भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस बालाकोटमधील हवाई हल्ल्याचे पुरावे मागत आहे. त्यात आता त्यांनी पुरावे मागणे थांबवून भारताची पाकिस्तानशी तुलना करणे सुरु केले आहे.