श्रीनगर: नववर्षाच्या सुरुवातीलाही सीमेवरील धुमश्चक्री कायम आहे. दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांची संख्या पाचवर पोहोचली आहे.


जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामात सीआरपीएफच्या छावणीवर काल दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात काल 4 जवान शहीद झाले होते, तर काही जवान जखमी होते. त्यापैकी आणखी एका जवानाची प्राणज्योत मालवली.

दुसरीकडे भारतीय जवानांनीही जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.

दोन्ही  दहशतवाद्यांची ओळख पटली असून, मंजूर अहमद आणि फरदीन अहमद अशी त्यांची नावं आहेत.  सध्या भारतीय लष्करानं इथं शोधमोहीम हाती घेतली आहे.

दहावीचा विद्यार्थी दहशतवादी

दरम्यान, सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना स्थानिक युवकांची साथ होती. धक्कादायक म्हणजे हल्लेखोर दोन दहशतवाद्यांमधील एकाचं वय केवळ 16 वर्षे होतं. त्राल परिसरात राहणारा फरदीन अहमद हा दहावीत शिकत होता. त्यापेक्षा धक्कादायक म्हणजे फरदीनचे वडील जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस कॉन्स्टेबल आहेत, असं वृत्त नवभारत टाईम्सने दिलं आहे.

मध्यरात्री हल्ला

सीआरपीएफ कॅम्पवर हा हल्ला शनिवार आणि रविवार दरम्यान रात्री 2.30 च्या सुमारास झाला. या हल्लायत 5 जवान शहीद झाले.

मात्र जवानांनीही प्रतिहल्ला चढवत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.

“अचानाक हल्ला होऊ शकतो, अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे आमचे जवान तयार होते. आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे”, अशी माहिती सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित बातम्या

पुलवामा हल्ला : 4 जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान