मुंबई : देशातील लाखो नोकरदारांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या पीएफ अर्थात प्रॉव्हिडंट फंडाचे कोट्यवधी रुपये बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. 'आयएल अँड एफएस' कंपनीवरील 91 हजार कोटींच्या कर्जामुळे पीएफ बुडित निघण्याची चिन्हं आहेत.


'इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनॅन्शिअल सर्व्हिसेस' (IL&FS) आणि त्यांच्या इतर सहकारी कंपन्यांमध्ये केंद्राने गुंतवलेले पैसे आता अडकल्यात जमा आहे.

या कंपन्यांमध्ये अडकलेली रक्कम अंदाजे 20 हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचं उच्चपदस्थ अधिकारी सांगतात. मात्र गुंतवलेल्या रकमेबाबत पुरेशी माहिती मिळत नसल्याने भविष्य निर्वाह निधीधारकांचे नेमके किती पैसे अडकले आहेत, याची आकडेवारी उपलब्ध नाही.

सध्या 'आयएल अँड एफएस' कंपनीवर 91 हजार कोटींचं कर्ज आहे. त्यात 61 टक्के थेट बँकांचं कर्ज, तर उर्वरित रकमेत डिबेंचर्समार्फत उभारलेल्या कर्जाचा समावेश आहे.

'IL&FS' ला मिळालेल्या ट्रिपल  A मानांकनाच्या आधारावर सल्लागारांनी या कंपनीचे बाँड्स विकत घेण्याचा सल्ला सरकारला दिला होता. असे मानांकन असलेल्या कंपनीतली गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.  'IL&FS' मध्ये पंजाब नॅशनल बँक, इंडसइंड बँक आणि बँक ऑफ बडोदाचा सर्वाधिक पैसा अडकला आहे.