ATM मध्ये पैसे नाहीत म्हणून नागरिकांनी नॅशनल हायवे रोखला!
एबीपी माझा वेब टीम | 03 Dec 2016 04:52 PM (IST)
अलाहाबाद : अलाहाबादमधील बँक ऑफ बडोदामध्ये गेल्या पाच दिवसांपासून पैसे उपलब्ध न झाल्याने लोकांनाचा संताप अनावर झाला. त्यानंतर अलाहाबाद-रीवा नॅशनल हायवेवर लोकांनी रास्तारोको करत काही तास वाहतूक ठप्प केली. शिवाय कुणालाही बँकेतही जाऊ दिलं नाही. पोलिसांनी दीड तासांच्या मोठ्या प्रयत्नांअंती हायवेवरील रास्तारोको आंदोलन मोडीत काढलं. अलाहाबाद शहरापासून जवळपास 50 किलोमीटर दूर मध्य प्रदेशच्या सीमेजवळील बँक ऑफ बडोदामध्ये गेल्या पाच दिवसांपासून एक रुपायाही मिळत नसल्याने अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याची लोकांची तक्रार आहे. अखेर संतापलेल्या लोकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून निदर्शनं सुरु केली. तर दुसरीकडे, हेड ऑफिसकडून शाखेत पैसे पाठवले जात नसल्याचे बँक कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. खरंतर बँक ऑफ बडोदामधील बँकेतीलच ही परिस्थिती नाही. तर अलाहाबादमधील ग्रामीण भागातील परिस्थितीही अशीच आहे. दरम्यान, अलाहाबादसारखीच स्थिती देशभर आहे. गरजेला पैसे मिळत नसल्याने लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.