बंगळुरु : नोटाबंदीनंतर देशाच्या विविध भागात पाचशे-हजाराच्या कोट्यवधीच्या नोटा पकडल्या जात आहेत. बंगळुरुत तर जुन्या नव्हे तर दोन हजाराच्या नव्या कोऱ्या नोटा पकडल्या.

या पकडलेल्या नोटा एक-दोन नव्हे तर तब्बल 5 कोटी 70 लाख रुपयांच्या होत्या. आयकर विभागाने दोनच दिवसांपूर्वी ही कारवाई केली.

तर इतकी रक्कम काढण्यासाठी 11 वर्षे रांग

एकीकडे नागरिक दिवस-दिवसभर रांगेत उभे राहून एकाच वेळी, एकाच दिवशी दोन हजाराची एकच नोट एटीएममधून काढू शकतात. मात्र नोटाबंदीला महिना होत असताना बंगळुरूत चार व्यक्तींकडे दोन हजारच्या नोटांमध्ये जवळपास 6 कोटी रुपये सापडले. त्यामुळे दिवस आणि पैसे काढण्याची मर्यादा, याचा हिशेब लावता-लावता सर्वसामान्यांचं गणित चुकणे साहजिक आहे.

कारण जर तुम्ही - आम्ही रांगेत उभं राहून इतकी रक्कम काढायची ठरवली असती, तर आजच्या नियमानुसार आपल्याला एक-दोन नव्हे तर तब्बल 11 वर्षे रांगेत उभं राहावं लागलं असतं.

चौघांकडून सुमारे 6 कोटीच्या 2 हजाराच्या नव्या नोटा

आयकर विभागाने बंगळुरुतील कर्नाटक सरकारच्या दोन इंजिनिअर्स आणि दोन कंत्राटदारांवरील छापेमारीदरम्यान सुमारे 6 कोटीच्या दोन हजाराच्या नोटा पकडल्या. 30 नोव्हेंबरला ही कारवाई केली.

पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्री म्हणजे 9 नोव्हेंबरपासून पाचशे आणि हजाराच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. दोन हजाराची नोट 10 नोव्हेंबरला लाँच झाली. मात्र नोटबंदीच्या आठवडाभरापर्यंत सर्वसामान्यांना आठवड्यात 24 हजारच काढता येत होते. पण बँकेतील चलन तुटवडा पाहता, बँकाही सर्वसामान्यांना दोन-चार हजार रुपयेच हातावर टेकवत होते.

रांगेचं गणित

जर चार प्रामाणिक भारतीय रांगेत उभे राहिले असते, तर त्यांना बँकेतून आठवड्याला प्रत्येकी 24 हजार रुपयेच काढता आले असते.  मात्र 5 कोटी 70 लाख रुपयांची रक्कम बँकेतून काढायची असती, तर त्यांना किमान 594 आठवडे किंवा 11 वर्ष आणि 5 महिने लागले असते.

अर्थात घरातील लग्नासाठी अडीच लाख रुपये काढता आले असते. मात्र बंगळुरुत पकडलेल्या चौघांच्या घरी एक-एक लग्न जरी पकडलं, तरीही  हे चौघे सुमारे 6 कोटीची रक्कम बँकेतून काढू शकले नसते.

जर या चौघांचे चालू खाते अर्थात करंट अकाऊंट असतं, तर आठवड्याला 50 हजार रुपये मर्यादा होती. त्यामुळे तरीही इतकी मोठी रक्कम काढण्यासाठी त्यांना 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला असता.

जवळपास सगळीकडेच एटीममध्ये खडखडाट असताना, बंगळुरुत इतकी मोठी रक्कम पकडल्याने, एटीएममध्ये पैसे का नाहीत, याचं उत्तर मिळू शकेल.