मुंबई : नोटाबंदीनंतर भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीला अच्छे दिन आल्याचं चित्र आहे. मुंबईतील दादरच्या एलआयसीच्या ब्रांचमध्ये एका दिवसात तब्बल 50 कोटींच्या पॉलिसींची विक्री झाली आहे.


एलआयसीची ही विक्रमी कमाई मानली जात आहे. एलआयसीच्या जीवन अक्षय पेंशन प्लॅनला ग्राहकांकडून सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. काही ग्राहकांकडून एक कोटी रुपयांच्या पुढील पॉलिसींचीही खरेदी करण्यात आली.

विशेष म्हणजे एका बॉलिवूड अभिनेत्याने 2 कोटींची पॉलिसी खरेदी केली असल्याची माहिती आहे.  या पॉलिसीअंतर्गत संबंधित अभिनेत्याला वर्षाला अंदाजे 15 लाख रुपये मिळतील, असं बोललं जात आहे.

दरम्यान अभिनेत्याने पॉलिसी खरेदी केल्याची माहिती सोशल मीडियावर कशी आली, याचं स्पष्टीकरण एलआयसीने ब्रांचकडून मागवलं आहे.

एका दिवसात 2300 कोटींची कमाई

एलआयसीची 30 नोव्हेंबरला विक्रमी कमाई झाली. या दिवशी एलआयसीने 50 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी एका स्कीमचे दर कमी करुन उत्पन्न क्षमता 7 ते साडे 7 टक्के कमी केली. या स्कीमच्या शेवटच्या दिवशी एलआयसीने 2300 कोटी रुपयांची कमाई केल्याचं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.

जीवन अक्षय योजनेला सर्वाधिक पसंती दिली जात असल्याचं बोललं जात आहे. कारण बँकांनी फिक्स डिपॉझिटचे दर कमी केल्याने ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. तर इकडे एलआयसीमध्ये मिळकतीची हमी असल्याने ग्राहक एलआयसीलाच जास्त पसंती देत असल्याचं चित्र आहे.

एलआयसीच्या व्यवसायात एका महिन्यात 104 टक्के वाढ

एलआयसीच्या जीवन अक्षय योजनेची नोव्हेंबरमध्ये तब्बल 8 हजार कोटींची कमाई झाली आहे. तर व्यवसायात एका महिन्यात 104 टक्के वाढ झाली असून वार्षिक सरासरीच्या 70 टक्के ध्येय आत्ताच गाठलं आहे, असं एलआयसीकडून सांगण्यात आलं आहे.