Operation Bluestar Anniversary: खलिस्तानवाद्यांविरोधात राबवलेल्या 'ऑपरेशन ब्लूस्टार'ला आज 38 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईच्या विरोधात आज पंजाबमधील खलिस्तानवाद्यांनी अमृतसरमध्ये बंद पुकारला आहे. आज सकाळी सुवर्ण मंदिराजवळ काहीजणांनी एकत्र येत खलिस्तानच्या समर्थनात घोषणाबाजी केली. यावेळी या जमावाने खलिस्तानी नेता जरनैल भिंद्रनवालेचे पोस्टरदेखील झळकावले. या घटनेनंतर अमृतसरमध्ये तणावाची स्थिती आहे.
अमृतसरमध्ये आज पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, सुवर्ण मंदिरातही मोठ्या प्रमाणावर पोलिसांना बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर पोलीस असतानाही खलिस्तानवाद्यांनी तलवारींसह सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी या शेकडोंच्या जमावाने सुवर्ण मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना सुरक्षा रक्षकांनी अटकाव केला.
अमृतसरमध्ये कडेकोट बंदोबस्त
ऑपरेशन ब्लू स्टारला 38 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमृतसरमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जवळपास सात हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये अर्धसैनिक दलाच्या तुकड्यांचा समावेश आहे.
रविवारी निघाला होता आझादी मार्च
कट्टरतावादी शीख संघटनांनी रविवारी आझादी मार्च काढला. यामध्ये दल खालसा, शिरोमणी अकाली दल (अमृतसर) आदी संघटनांसह इतर खलिस्तानवादी गटांनी शहरात आझादी मार्च काढला. यावेळी मोर्चात खलिस्तानची मागणी करण्यात आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या: