Arvind Kejriwal in Gujarat : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने सत्ता काबिज केल्यानंतर आता आपला मोर्चा अन्य राज्यांकडे वळवला आहे. दुसऱ्या राज्यात पक्षाचे स्थान बळकट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्ली, पंजाबपाठोपाठ गुजरात राज्यातही आप ची ताकद वाढवण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे. यावर्षी गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला विजय मिळाल्यानंतर त्यांचे मनोबल वाढले आहे. अन्य राज्यात पक्षाची ताकद वाढवण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. गुजरातमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी आप ने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये आपला झेंडा फडकवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आता तिरंगा यात्रेच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करण्याचे काम करण्यावर भर देत आहेत. अशा परिस्थितीत आज दुपारी साजेतीन वाजण्याच्या सुमारास दिल्ली विमानतळावरुन केजरीवाल गुजरातमधील अहमदाबादकडे रवाना होणार आहेत.
तिरंगा यात्रेत सहभागी होणार
गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास ते आम आदमी पक्षाच्या तिरंगा यात्रेत सामील होतील. ही तिरंगा यात्रा मेहसाणाच्या जुन्या बसस्थानकापासून सुरु होईल. त्यानंतर केजरीवाल रात्री अहमदाबादहून दिल्लीला रवाना होतील.
आप गुजरातमधील सर्व जागा लढवणार
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की त्यांचा पक्ष गुजरातमधील विधानसभेच्या सर्व 182 जागा लढवणार आहे. सर्व जागा लढवणार आहे, त्यामुळे निवडणुकीच्या वेळी लोकांना पर्याय असेल असे सिसोदिया म्हणाले. 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच आपले उमेदवार उभे केले होते. तेव्हा पक्षाचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नव्हता. फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या सुरतच्या नगरपालिका निवडणुकानंतर आप'च्या अपेक्षा वाढल्या आहेत. सुरत महापालिका निवडणुकीत आप ला 27 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपने 93 जागा जिंकल्या होत्या.