उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये झालेल्या धर्मसंसदेवरुन एमआयएमचे खासदार असद्दुदीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. धर्मसंसदेतील वक्त्यांनी मुस्लिमांविरुद्ध हिंसाचाराचं समर्थन करत भडकावू आणि चिथावणीखोर भाषणे दिली आहेत. याविरोधात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या धर्ससंसदेत भाजप सरकार देखील सामील असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून, यामध्ये असणाऱ्या दोषींवर कारवाई होईल असे ओवेसी यावेळी म्हणाले. लोक उघडपणे हिंसेचे समर्थन करत असताना सरकार काहीच करत नसल्याचे देखील ओवेसी म्हणाले.


या धर्मसंसदेत केलेल्या भडकावू भाषणाविरोधात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली आहे. या धर्मसंसदेत ज्यांनी ज्यांनी भडकावू आणि हिंसेचे समर्थन करणारी वक्तव्य केली आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हिंसाचारासाठी प्रवृत्त करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. नरेंद्र मोदी हे कायमच पंतप्रधान राहणार नाहीत. योगी आदित्यनाथ हे कायमच मुख्यमंत्री राहणार नाहीत. तुमच्या अन्यायाला आम्ही कधीही विसरणार नाही? दिवस बदलणार आहेत, तेव्हा तुम्हाला वाचवायला कोण येणार? असा सवालही ओवेसी यांनी केला आहे.


कानपूर येथील रसूलाबाद पोलीस स्टेशनमध्ये एका 80 वर्षीय वृद्ध असेलेले मोमहम्मद रफिद यांच्यावर पोलिसांनी अत्याचार केले. गजेंद्रपाल सिंग असे त्यांचे नाव आहे. या घटनेचे मला दु:ख झाल्याचे ओवेसी यांनी सांगितले. मुस्लिमांविरुद्ध एवढा रोष का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दिवस बदलणार तेव्हा मोदी पर्वतावर आणि योगी मठात जाणार. मग तेव्हा तुम्हाला वाचवायला कोण येणार असेही ओवेसी म्हणालेत.


दरम्यान, उत्तराखंड हरिद्वारमध्ये 17 पासून 19 डिसेंबरपर्यंत धर्म संसदेचं (Dharma Sansad) आयोजन करण्यात आलं होतं. या धर्म संसदेत साधू-संतांनी हिंदुत्वासंदर्भात केलेल्या वादग्रस्त भाषणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या धर्म संसदेतील वक्त्यांनी कथितरित्या मुस्लिमांविरुद्ध हिंसाचाराचं समर्थन केलं आणि 'हिंदू राष्ट्रा'साठी संघर्ष पुकारण्याचं आवाहन केल्याचं सांगण्यात येतंय. माजी लष्करप्रमुख, कार्यकर्ते आदींनी या वादग्रस्त भाषणाचा तीव्र निषेध करत कारवाईची मागणी केली आहे. तसेच तृणमूल काँग्रेसचे नेते आणि आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी या प्रकरणी आयोजक आणि वक्त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तीन दिवसांच्या या धर्म संसदेचा समारोप सोमवारी करण्यात आला होता. धर्म संसदेचा समारोप होऊन तीन दिवस उलटून गेल्यानंतर गुरुवारी उत्तराखंड पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, आतापर्यंत याप्रकरणी कोणावर कारवाई करण्यात आलेली नाही. उत्तराखंड पोलिसांनी याप्रकरणी केवळ एका आरोपीचे नाव दिले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: