मुंबई : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारात प्रियंका गांधी सक्रीयपणे सहभागी होणार आहेत. शिवाय, उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारात प्रियंका यांची महत्त्वपूर्ण भूमिका असेल, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली.

 

वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत प्रियंका गांधी

 

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या तुघलक रोडवरील घरी त्यांच्याच अध्यक्षतेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. विशेष म्हणजे, या बैठकीला प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणूक आणि त्यासाठीच्या प्रचाराच्या रणनितीवर चर्चा झाली.

 

प्रशांत किशोर यांच्यासोबत चर्चा

 

सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबतच अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव आणि उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रभारी गुलाम नबी आझाद, उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार शीला दीक्षित आणि उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राज बब्बर उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक अभियान प्रचार रणनितीकार प्रशांत किशोरही बैठकीला हजर होते.

 

प्रियंका गांधींची भूमिका महत्त्वाची

 

उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत मतभेदांबाबत प्रशांत किशोर यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबतही बैठकीत चर्चा झाली. उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रियंका गांधींची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, अशी माहिती यूपी अभियान समितीचे अध्यक्ष संजय सिंह यांनी दिली.