नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यात अखिलेश-मुलायम यांच्यातील वादाने 'यादवी' माजली आहे. अशातच आता अखिलेश यांनी काँग्रेसशी युती केली. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती होण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका प्रियांका गांधी यांनी बजावली.


समाजवादी पक्षासोबत काँग्रेसची युती व्हावी, म्हणून दोन्ही बाजूंनी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. एक वेळ अशीही आली की, सपा-काँग्रेसमध्ये युती होणार नाही. मात्र, रविवारी सर्व अडथळे दूर होऊन उत्तर प्रदेशात भाजपचा महामेरु रोखण्यासाठी काँग्रेस आणि सपाने युती केली.

समाजवादी पक्षासोबत काँग्रेसची युती होण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका प्रियांका गांधींनी बजावल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे या वृत्ताला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनीही दुजोरा दिला आहे.

अहमद पटेल याबाबत बोलताना म्हणाले, "समाजवादी पक्षासोबत युतीसंदर्भातील चर्चेसाठी काँग्रेसकडून कुणीच मोठा नेता सहभागी नव्हता, असं म्हणणं अयोग्य ठरेल. कारण समाजवादी पक्षासोबत चर्चेसाठी काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी महासचिवांसोबतच प्रियांका गांधीही सहभागी होत्या."

नवज्योत सिंह सिद्धू यांना काँग्रेसमध्ये आणणं आणि उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाशी युती करणं, या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टींसाठी प्रियांका गांधी यांचीच भूमिका महत्त्वाची होती. आता अशी चर्चा आहे की, प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव प्रचारादरम्यान एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.